पशिक्रापूर । हिवरे, पिंपळे खालसा व खैरेवाडी येथे अनेक दिवसांपासून वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. विजेचा लपंडाव वाढल्याने तीनही गावच्या संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी शिक्रापूर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली होती. अधिकार्यांना धारेवर धरत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
हिवरे, पिंपळे खालसा तसेच खैरेवाडी येथील ग्रामस्थांनी अधिकार्यांना घेराव घालत त्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, पिंपळे खालसाचे सरपंच राजाराम धुमाळ, उपसरपंच संदीप सुरसे, हिवरेचे चेअरमन सुनील जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष धारराव जगताप, खैरेवाडीचे सरपंच नवनाथ खैरे, माजी सरपंच रामदास मांदळे, जय हनुमान उपसा सिंचनचे चेअरमन पंढरीनाथ तांबे, पांडुरंग धुमाळ, सुरेश धुमाळ, राजेंद्र भोसले, प्रकाश धुमाळ, आप्पासाहेब धुमाळ, बाजीराव जगताप, मोहन मांदळे, कारभारी जगताप, अशोक खैरे, नारायण साळुंके आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता कामे चांगली करा !
शिक्रापूर येथे असलेले विद्युत वितरण विभागाचे कार्यालय सध्या नूतन इमारतीत सुरू करण्यात आले असून हे नवीन कार्यालय सुरू होताच शुक्रवारी प्रथमच तीन गावच्या ग्रामस्थांनी येथे मोर्चा काढला होता. येथील अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरत चांगले कार्यालय मिळाले आहे आता कामे पण चांगली करा, असे ग्रामस्थांनी सुनावले.
सध्या लोडशेडींग सुरू आहे. तसेच शेतकर्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. ठरलेल्या वेळेत वीज भेटत नसल्याने उन्हाळ्यातील पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखिल निर्माण झाला आहे. यापूर्वी या भागासाठी असलेल्या 22 केव्ही च्या ट्रान्सफार्मरमधून होणारा वीज पुरवठा पूर्ववत करून द्यावा, अशी देखील मागणी ग्रामस्थांनी केली. आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलनाचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. लवकरच ग्रामस्थांच्या अडचणी सोडविणार असल्याचे आश्वासन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी दिले आहे.
ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील
हिवरे, पिंपळे खालसा व खैरेवाडी येथे पूर्वी 22 केव्हीच्या ट्रान्सफार्मर मधून वीजपुरवठा होत होता. परंतु सध्या सर्वत्र 11 केव्हीचे ट्रान्सफार्मर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. परंतु या गावांमध्ये असलेले पाच मेगा व्होल्ट अॅम्पियरचे रोहीत्र बदलून दहा मेगा व्होल्ट अॅम्पियरचे रोहीत्र बसविल्यास ग्रामस्थांच्या अडचणी सुटणार असून वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करू, असे विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.