ग्रामीण भागातील आईन्स्टाईन व न्यूटन शोधावेत

0

पुणे । राष्ट्रपिता ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता आणि कुतूहल ठासून भरले आहे. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी हवी आहे. त्यांच्यात दडलेले आईन्स्टाईन, न्यूटन व सी. व्ही. रामन शोधण्याची जबाबदारी आपल्यासारख्या शिक्षकांवर आहे. त्यांच्यातील गुणवत्तेला नवनिर्मितीची जोड देऊन चांगला नागरिक घडविण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव यांनी केले.

एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या वतीने आयोजित दुसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसमधील ‘शिक्षकांचे प्रशिक्षण’ या विषयावरील पाचव्या सत्रात डॉ. राव बोलत होते. याप्रसंगी डॉ. नंदकिशोर कोंडप, डॉ. आर्ट चॅडविक, प्रा. डॉ. मायकल जेन्सन, श्री. मनीष कुमार, प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा. राहुल कराड, प्रा. शरदचंद्र दराडे, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. रवीकुमार चिटणीस, डॉ. सायली गणकर, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. एव्हेलिन ब्रिन्दा, डॉ. आसावरी भावे गुडीपुडी आदी उपस्थित होते.

परीक्षापद्धती अनाकलनीय
डॉ. राव म्हणाले, शिक्षकी पेशा निःस्वार्थी असला पाहिजे. जे पुस्तकात नाही, ते ज्ञान शिकवण्याची परंपरा शाळा-विद्यापीठ स्तरावर सुरू व्हायला हवी. शिक्षकांनी अधिक सर्जनशील, संशोधनात्मक आणि संवादशील बनले पाहिजे. शिक्षक आणि अध्यापनाच्या पद्धतीत गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या शिक्षणव्यवस्थेतील परीक्षापद्धती अनाकलनीय आहे. या परीक्षाभिमुख शिक्षणामुळे अनेक चांगल्या लोकांना बाजूला ठेवण्याचे काम होत आहे.

प्रश्‍नार्थक, प्रात्यक्षिक शिक्षणावर भर
डॉ. चॅडविक म्हणाले, आपल्या शिकविण्यात नवकल्पनांना अधिक संधी असायला हवी. केवळ पुस्तकांचे अनुयायी न होता पुढाकार घेऊन नव्या गोष्टी शिकविण्याच्या प्रयत्न शिक्षकांनी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. डॉ. मायकल जेन्सन म्हणाले, वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आव्हान आज शिक्षकांसमोर आहे. प्रश्‍नार्थक, प्रात्यक्षिक शिक्षणावर भर द्यायला हवा. डॉ. प्रा. कृष्णा वेदुला म्हणाले, आपण जे शिकवितो, ते विद्यार्थी ग्रहण करतात का? हा प्रश्‍न आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण आज 8 ते 10 मिनिटांपेक्षा अधिक काळ विद्यार्थी लक्ष केंद्रित करीत नाहीत.