ग्रामीण भागातील रस्ते विकासाला प्राधान्य

0

जळगाव । दळणवळणाच्या सुविधांवर त्या भागाचा विकास अवलंबून असतो. घराघरापर्यत रस्ते पोहोचल्याने चांगल्या रस्त्यांमुळे ग्रामीण भाग शहरी भागाला जोडण्यास मदत होणार असल्याची बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातील रस्ते विकासास प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी 16 रोजी केले.

2 कोटी 29 लाख 33 हजाराचा निधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेतर्फे आसोदा ते देऊळवाडे रस्त्याच्या कामाचा भूमिपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसगी ते बोलत होते. आसोदा ते देऊळवाडे 4/880 ते 9/390 या 4.50 किलोमीटर लांबीच्या व 2 कोटी 29 लाख 33 हजार रुपये खर्चाच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपुजन करण्यात आले. या कामाची मुदत 12 महिने असली तरी कंत्राटदाराने हे काम वेळेपूर्वी करुन नागरीकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करुन देण्याचे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या परिसरात 40 कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे सुरु असून पुढेही विविध विकासाची कामे करण्यात येणार आहे. रस्त्यांची कामे करतांना कंत्राटदारांनी कामांचा दर्जा चांगला ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. चांगल्या रस्त्यांमुळे परिसरातील शेतकर्‍यांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच रस्त्यांची सुविधा चांगली असेल तर ग्रामीण भाग शहरी भागाला लवकर जोडला जाऊन विकास जलदगतीने होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जि. प.सदस्य पवन सोनवणे, पं.स.सदस्य नंदू पाटील, तुषार महाजन, नंदू पाटील, सरपंच गेंदालाल सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, नानाभाऊ सोनवणे, मुकेश सोनवणे, बापू महाजन यांचेसह विविध गावांचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.