भडगाव । ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना खरी दिशा व मार्गदर्शनाची गरज आहे. आजचा युवक दिशा व मार्गदर्शन अभावी सोशलमीडियावर भरकटत चालला आहे. सोशलमीडियाचा सद्पयोग केला पाहिजे. आजच आपले टार्गेट आखून तो अभ्यास प्रामाणिक प्रयत्नाने करा, आपण अगदी एक वर्षात आवश्यक ते पद मिळवू शकतो. आजकाल स्पर्धेचे युग असून त्यात आपण वाहून घेतले पाहिजे. यासाठी आधी शहरी भागात असलेल्या अनेक अभ्यास व मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागापर्यंत पोहचल्या आहेत. आपल्या शेतकरी कुटुंबातील घरात या परीक्षांच्या माध्यमातून लाल दिवा येणं ही परिवारासाठी अभिमानाची बाब असते, त्यासाठी आपण आजच चिकाटी वजिद्दीने तयारीला लागले पाहिजे. स्पर्धा परीक्षांची संधी गमावू नका असे मोलाचे मार्गदर्शन जळगाव येथील दी युनिक अकॅडमीचे सुनील देशमुख यांनी केले.
मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांशी केले हितगुज
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक अमोल पाटील व प्रा.गुणवंत अहिरराव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षासाठी पूर्वी असलेला संघर्ष व आजच्या सुविधा यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांशी अध्यक्षीय भाषणातून हितगुज साधले. कार्यशाळेत विविध प्रश्नांची उत्तरे दिलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी खास आयोजक इंदाई फाऊंडेशनच्या वतीने सवलतीच्या दरात स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी भरगोस लाभ घेतला. कार्यक्रमा दरम्यान शासनाचा जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार पुरस्कार मिळाल्याने पत्रकार सुधाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चिडामन पाटील सर सूत्रसंचालन व आभार नरेन्द्र पाटील यांनी मानले.
कार्यशाळेत यांची होती उपस्थिती
येथील किसान शिक्षण संस्थेच्या सभागृहात येथे डॉ.संजीव पाटील युवा प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व दी युनिक अकॅडमी जळगाव यांच्या संयुक्तविध्यमाणे ‘12 नंतर काय? स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन‘ यावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ.संजीव पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, प्रा.गुणवंत अहिरराव, शहराध्यक्ष शैलेश पाटील, जळगावचे अनिल सोनवणे, राजेश पाटील, के.एन.पाटील, सुधाकर पाटील, नरेंद्र पाटील, प्रतिष्ठानचे विनोद नेरकर, चुडामण पाटील, नितीन महाजन, कुणाल खैरे, युगल मोरे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत असलेल्या तसेच उत्सुक विद्यार्थीवर्गाची उपस्थिती होती.