रावेर। ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य उत्तम रहावे शहरापेक्षाही ग्रामीण भागात ठिक- ठिकाणी आरोग्य सेवा पोहचावी जेणेकरुन गरीब जनतेची हेळसांड होणार नाही यादृष्टीने जिल्हापरिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतील याचा लाभ तळागाळातील नागरिकांना होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले. तालुक्यातील तांदलवाडी गावात आयुर्वेदीक रुग्णालयाचे भुमीपूजन नुकतेच पार पडले. यावेळी महाजन बोलत होते.
विकास कामे प्रगतीपथावर
जिल्ह्यातील नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या मार्गदर्शनामुळेच गावाच्या विकासाला हातभार लागत आहे. यापुर्वी गावात गटारी, रस्ते, सामाजिक सभागृह, दलीत वस्तीचे कामे, दवाखाने यासह इतर विकास कामे प्रगतीपथावर आहे. असे तांदलवाडीचे सरपंच श्रीकांत महाजन यांनी सांगितले.
तांदलवाडी परिसरातील गावांना होणार फायदा
तांदलवाडी गावाला लागून बरीच लहान मोठी खेडी असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही. त्यांना उपचारासाठी रावेर येथेच यावे लागत असते. मात्र तांदलवाडी येते होत असलेल्या आयुर्वेदीक दवाखान्याचा या भागातील गोर गरीब नागरिकांना लाभ होणार आहे. त्यांची रावेर येथे भाडे खर्च करुन होणारी पायपीट वाचणार आहे.
यांची होती उपस्थिती
दरम्यान भुमी पुजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा सरचिटणीस शिवाजीराव पाटील, महेश चौधरी, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दुर्गादास पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ नेमाडे, पंचायत समिती सदस्या कविता कोळी, ग्रामपंचायत सदस्य कविता सपकाळे, नितीन महाजन, वैशाली झाल्टे, आशा चौधरी, सोनाली चौधरी, उदयभान चौधरी आदी उपस्थित होते.