ग्रामीण भागात ट्रान्सफार्मरच्या ऑईलचोरीच्या घटनांमध्ये वाढ

0

तालुक्यात ग्रामीण भागात विद्युत ट्रांसफार्मर मधील ऑइल चोरी करणाार्‍या चोरांची टोळी कार्यरत झाली असुन विद्युत वितरण विभागासह पोलीस प्रशासनाला आव्हान ठरत आहे. आतापर्यंत शेती उपयोगी साहित्य केबल वायर, ठिबक सिंचन नळ्या , सातत्याने चोरी होत होती. आजही चोरीचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे. शेवटी चोरटेच सापडत नसल्याने शेतकर्‍यांनी पोलीसांत तक्रार देणेच बंद केले आहे. आता ट्रांसफार्मरमधून ऑइल चोरीस नेतात. अंधार्‍या रात्रीचा फायदा घेत हा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे त्या भागातील विद्युत पुरवठा अगोदर खंडीत केला जातो. याचा अर्थ तज्ञ खाजगी वायरमनचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्युत पुरवठा सरळ बंद होत नाही तर त्या भागातला ए. बी. सी. बंद करावा लागतो. ट्रांसफार्मर उघडण्यासाठी साहित्य लागते. ते चोरट्यांजवळ उपलब्ध असते. म्हणजे मोठी टोळी सक्रीय असण्याचा संशय आहे . आतापर्यंत ऑइल चोरीचा अनेक तक्रारी पोलीसात दाखल झाल्या होत्या. पण चोरट्यांचा शोध लागला नाही. विद्युत वितरण विभागात तक्रारी आहेत. ट्रांसफार्मर मधुन ऑइल चोरीस गेल्यास व ऑइल पातळी कमी झाल्यास ते ट्रांसफार्मर निकामी होते व त्याचा भुर्दंड शेतकर्‍यांना बसतो व पिकाचे नुकसान होते. ट्रांसफार्मर ऑइल चोरी ही केवळ शहादा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात इतर तालुक्यात देखील आहे म्हणुन पोलीसानी या टोळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी आहे. पोलीसानी रात्रीचा वेळी गस्त घालणे आवश्यक आहे. शहादा शहरात ट्रांसफार्मर दुरुस्ती कार्यशाळा करावी ही जुनी मागणी आहे. गेल्या अंनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी आश्‍वासन देत आहेत. ही कार्यशाळा दोंडाइचा इथे असल्याने शेतकर्‍यांना आपल्या खाजगी वाहनाने न्यावे लागते. पंधरा ते वीस दिवस ट्रांसफार्मर मिळत नाही. शेतकर्‍यांची बागायती पिके धोक्यात येतात. काहीदा तर चाळीसगाव येथुन ट्रांसफार्मर मागवावे लागतात. म्हणुन शहादा येथे कार्यशाळा झाल्यास मोठा प्रश्‍न मिटणार आहे. उन्हाळा व अतिरिक्त विज पुरवठा यामुळे ट्रांसफार्मर जळतात किंवा गरम होवुन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकमंत्री जयकुमार रावल व खा. हिना गावीत यानी याबाबीकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे अशी चर्चा आहे.

– प्रा.गणेश सोनवणे, शहादा
9421530587