| बामखेडा | राकेश गवळे | बोचरी थंडीचा जोर वाढल्यानंतर वातावरणातील बदल झाल्यामुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात सर्दी, खोकल्यास तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, तापसदृश्य आजारांनी डोके वर काढल्याने आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. दुसरीकडे कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गावात अनेक घरांमध्ये सर्दी, खोकला व इतर ताप सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून येतांना दिसत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात रुग्णांनी उपचारासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या ऋतु संधी काळ सुरू आहे. ऋतु संधी काळात शारीरिक प्रतिकार शक्ती कमी होत असते. त्याचा फायदा घेऊन वातावरणात आधीच उपस्थित असलेले विषाणू शरीरावर हल्ला चढवितात. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी फरक तो एवढाच की, एन्फ्लुऐझाच्या जोडीला कोविडच्या विविध विषाणूंनी हाहाकार माजवला.अर्थातच डायग्नोस्टिक टेस्ट जर वाढविल्या तर हा आकडा अजून फुगेल. तेव्हा कोणी कितीही सांगितले तरी मास्क जरूर वापरा. समाजात व बाजारपेठमध्ये वावरतांना सुरक्षित अंतर पाळा, पोष्टीक आहार, शारीरिक व्यायाम यांना पर्याय नाही. या गोष्टीमुळे भविष्यातही तब्येत निरामय राहण्यास नक्कीच मदत होईल. आजारपणात योग्य ठिकाणी डॉक्टरी सल्ला घ्या. स्वतः औषध पाणी करून गंभीर त्रास ओढवून घेऊ नका, असे बामखेडाचे डॉ.योगेश चौधरी यांनी सांगितले.
कोरोना नियमांचे पालन करावे
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी, डोकेदुखी, खोकला व ताप सदृश्य रुग्णांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. सौम्य लक्षणे जाणवत असल्यास अशा नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे.
-डॉ.प्रशांत चौधरी (प्राथमिक आरोग्य केंद्र, वडाळी)