यावल। येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर आता सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातर्फे यावल ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात पाच सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत. या कॅमेर्यांमध्ये होणारे चित्रिकरण थेट रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पाहता येणार आहे. दोन महिन्यांपुर्वी यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचार्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती.
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना दिलासा
हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आल्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच या प्रकरणातील दोषींची ओळख पटल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
यासोबतच ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्यांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयाच्या कर्मचार्यांना दैनंदिन कामकाज करताना त्रास सहन करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करून, सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाने या मागणीची दखल घेऊन यावल ग्रामीण रुग्णालयात पाच सीसीटिव्ही कॅमेरे लावले. त्यामुळे रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळापासून असलेली मागणी पूर्ण झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मारहाणीनंतर सीसटिव्हीच्या मागणीने धरला होता जोर
गावातील काही तथाकथीत पुढारी रुग्णालयात येऊन रुग्णांवरील उपचारांमध्ये हस्तक्षेप करत होते. मात्र, सीसीटिव्ही कॅमेर्यांमध्ये हालचालींचे चित्रिकरण होणार असल्याने या प्रकारांना आता पायबंद बसणार आहे. तसेच रुग्णालयाच्या आवारात वारंवार संशयास्पद पद्धतीने फिरणार्यांच्या हालचालीदेखील कॅमेर्यात कैद होणार आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांवर दबाव आणण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. दोन महिन्यांपुर्वी रुग्णालयातील कर्मचार्यांना मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर रुग्णालयात सीसीटिव्ही लावण्याची मागणीने जोर धरला होता.
कर्मचार्यांनी केले स्वागत
रुग्णालयातील मुख्य प्रवेशद्वार, शवविच्छेदन गृहासमोरील भाग, औषध वितरण विभाग, रुग्णालयातील व्हरांडा आणि आंतररूग्ण विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ अशा पाच ठिकाणी सीसीटिव्ही लावले आहेत. या भागात घडणार्या घडामोडी आणि हालचालींवर आता प्रशासनाची नजर राहणार आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचार्यांना दमदाटी करणार्यांची ओळख पटवणे पोलिसांना सोपे होईल. त्यामुळे सीसीटिव्ही लावण्याचा निर्णयाचे रुग्णालयातील कर्मचार्यांनी स्वागत केले आहे.
वरिष्ठांनी घेतली दखल
रुग्णालयातील कर्मचार्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे कामकाज करताना अडचणी येत होत्या. मात्र, रुग्णालयात सीसीटीव्ही लावल्यामुळे आता ही समस्या सुटणार आहे. कामकाजाच्या दृष्टीने रुग्णालयाच्या आवारात सीसीटीव्ही असणे आवश्यक होते. याबाबत पाठपुरावा केला होता. वरिष्ठांनी दखल घेतल्यामुळे आता समस्या दूर झाली आहे. कर्मचार्यांना सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे दिलासा मिळाला आहे.