ग्रामीण शहरी भागातील सरकारी जागेतील अतिक्रमणे नियमीत करण्याचा प्रस्ताव!

0
मुंबई : गायरान, गावठाणे, सरकारी उकिरडे, खळवाढीच्या सरकारी जागांवरची सर्व बांधकामे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नव्याने घेण्याचे प्रस्तावित केले असून याबाबत विधी व न्याय खात्याचा अभिप्राय येताच राज्य मंत्रिमंडळाच्या मंजूरीसाठी हा विषय येवू शकेल अशी माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामिण भागातील सरकारी जागांवरील वस्त्या अल्प पैसे भरुन सर्व बांधकाम नियमित करता येतील अशी चर्चा काही माध्यमातून देण्यात आली होती.
आदर्श प्रकरणानंतर २०१३ साली सरकारी जागेवरची अतिक्रमण नियमित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय सरकारने आता बदलला असून, २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वेळोवेळी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने गावाच्या हद्दीलगत गावठाण वस्त्यांबाहेर नव्याने सरकारी जागेत अतिक्रमणे करून राहिलेल्यांना सन २०११ आणि २०१३मध्ये त्यांची राहती घरे नियमानुकूल करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक गावांचा विस्तार वाढला असून हद्दवाढ देखील झाली आहे. प्रामुख्याने मध्यम किंवा मोठ्या शहारांच्या लगत असलेल्या या गावांच्या अश्या वस्त्या नियमीत करताना नगरविकास आणि ग्रामविकास विभागाच्या विकास नियमावलींच्या कायदेशीर तरतूदीमुळे अश्या वस्त्या अतिक्रमित म्हणून गणल्या जात होत्या.
सरकारी जमिनीवर असलेल्या या वस्त्या कुणाच्या अखत्यारीत येतात यावरून महसूल ग्रामविकास अणि नगरविकास यांच्यात संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे अश्या वस्त्यांचे नव्याने सर्वेक्षण करून त्या निवडणूकांपूर्वी नियमानुकूल करून घेण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. या वृत्तानुसार, तसेच ग्रामीण भागातील सरकारी जागेवरील सर्व अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०११किंवा त्यापूर्वीची सर्व बांधकामे नियमित केले जातील. गायरान, गावठाणे, सरकारी उकिरडे, खळवाढीच्या सरकारी जागांवरची सर्व बांधकामे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे आता मागासवर्गीय वस्त्या नियमित होतील. अल्प पैसे भरुन सर्व बांधकाम नियमित करता येतील.ब्रिटीशांनी खळे करण्यासाठी, जनावरे उभी करण्यासाठी, चराईसाठी, वाढच्या वस्तीसाठी गावठाणाच्या जमिनी निश्चित केल्या होत्या. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती.