ग्राहक पंचायत व ग्राहक पेठ ही सामाजिक नवनिर्मिती

0

पुणे । महात्मा गांधी यांच्या म्हणण्यानुसार ग्राहक हा राजा आहे आणि हेच बोधवाक्य घेऊन ग्राहक पेठेसारख्या संस्था कार्यरत आहेत. सुरुवातीपासून ते आजपर्यंत अशा संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ग्राहकांची पिळवणूक थांबविण्यासाठी त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक पंचायत सुरू झाली. हेच ध्येय समोर ठेवून ग्राहक पेठ कार्यरत असून ही आजच्या काळातील ही खरी सामाजिक नवनिर्मिती आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

गणेश कला क्रीडा मंच येथे ग्राहक पेठेतर्फे ग्राहक चळवळीतील भरीव योगदानाबद्दल डॉ. भा.र. साबडे व ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सूर्यकांत पाठक, एस.आर. कुलकर्णी, संध्या भिडे, राजेश शहा उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सभापती पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विशाल चोरडिया आणि कॉमनवेल्थ युथ काउन्सिल, लंडनच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. मिलिंद भोई यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

गीतांमधून प्रभात थिएटरचा प्रवास
पुरस्कार समारंभांतर्गत ‘प्रभात’ ते ‘सैराट’ या मराठी चित्रपटांच्या सांगितीक दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी चित्रपटांच्या गीतांमधून प्रभात थिएटरचा प्रवास उलगडला. राहुल सोलापूरकर यांनी निवेदन, चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, देविका आणि मोहिका दामले यांनी गायन केले. ऋतुजा इंगळे, ऐश्‍वर्या काळे, सुमीत गजमल, अभिषेक हावरागी, उत्कर्षा रोकडे यांचे नृत्यसादरीकरण झाले.

हीच खरी ग्राहक चळवळ
डॉ. भा. र. साबडे म्हणाले, ग्राहक चळवळीतील संस्थेचे नाव देशी असावे, असा बिंदूमाधव जोशी, ग. वा. बेहेरे यांचा आग्रह असे. त्यामुळे ग्राहक हा केंद्रबिंदू मानून ग्राहक पेठ या नावाने ही संस्था मेहनतीने सुरू झाली. अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे म्हणाले, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे ग्राहक पंचायतीचे खरे कार्य आहे. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातूनच पुढे ग्राहक पेठेसारख्या संस्थांची निर्मिती झाली आणि हीच खर्‍या अर्थाने ग्राहक चळवळ आहे, असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या महोत्सवाची उलाढाल 2.25 कोटी रुपये इतकी झाली, असे पाठक यांनी सांगितले. यावेळी तांदूळ महोत्सवातील भाग्यवान ग्राहकांना स्वामिनीतर्फे रियाज अहमद शेख यांच्या हस्ते पैठणी भेट म्हणून देण्यात आली.