वरणगाव : शहरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने सर्वपक्षीय व व्यापारी संघटनेच्या वतीने शनिवार ते मंगळवार चार दिवसाचा स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. बुधवारी वरणगाव उघडल्यानंतर बाजार कुठे भरायचा ही माहिती नसल्यामुळे काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते तर नागरीकांना बाजाराची माहिती न मिळाल्याने विक्रेत्यांचा माल शिल्लक राहिला. शहरांमध्ये बुधवारी सकाळी वरणगाव शहर उघडले. मकरंद नगराच्या रस्त्यावर व बसस्थानक चौकात भाजीपाला विक्रेत्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. नगरपालिकेने भाजी विक्रीसाठी महात्मा गांधी विद्यालय, गंगाधर सांडू चौधरी विद्यालय, जिल्हा परषद शाळा येथील पटांगणावर आरक्षित करून विक्रेत्यांनी या ठिकाणी बसावे व ग्राहकांनी देखील भाजीपाला घेण्यासाठी याच ठिकाणी जावे त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावर कोणीही दुकाने लावू नये, असे नियोजन केले होते परंतु ही दवंडी अथवा माहिती नागरिक व विक्रेत्यांनपर्यंत पोहोचली नसल्यामुळे सकाळच्या वेळी खूप गोंधळ झाला होत.
नागरीक संंभ्रमात तर विक्रेत्यांनाही मनस्ताप
पोलिस प्रशासन व पालिकेने या सर्वांना इथून उठून आरक्षित जागेत बसण्याचे सूचित केले विक्रेत्यांनी आपली दुकाने या जागेवर उभारली परंतु शहरातील नागरिकांना याबाबतची माहिती नसल्यामुळे विक्रेते हातावर हात धरून दिवसभर बसले होते तर काहींचा माल शिल्लक राहिल्याने परत तसाच घरी न्यावा लागला. तसेच बोदवड रस्त्यावर कंटेनमेंट झोन असतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी सकाळच्या वेळेला झाली होती यामुळे बस स्टँड चौक ते महात्मा गांधी विद्यालयाचे गेटपर्यंतपर्यंत पूर्ण रस्ता बंद केल्याने आता सुसरी-आचेगाव-पिंपळगाव-बोदवड या बाजूला जाण्यासाठी आजूबाजूच्या कॉलनीमधून वाहनधारकांना जावे लागणार आहे.