‘ग्रीन कॅम्पस’साठीही पब्लिक बायसिकल सेवा पूरक

0

पुणे । कृषी महाविद्यालय यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. या ऐतिहासिक क्षणी पुणे स्मार्ट सिटी व झूमकारच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या आवारात सायकल सेवा 1 रुपया प्रति अर्धा तास या दरात उपलब्ध होत आहे, विद्यार्थी, अध्यापक व कर्मचार्‍यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. आरोग्य, तसेच पर्यावरणरक्षणासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण आहे. मात्र, ती अधिक शाश्‍वत होणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचा परिसर ग्रीन कँपस करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदवावा. ग्रीन कँपस उपक्रमासाठीही पब्लिक बायसिकल सेवा पूरक ठरणार आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांनी सांगितले.

पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत कृषि महाविद्यालयात पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचे उद्घाटन डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांच्या हस्ते करण्यात आले.
या योजनेअंतर्गत कृषिमहाविद्यालयात व पुणे परिसरात 50 सायकली प्रति 1 रु. अर्धा तास इतक्या नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. या समारंभाला डॉ. राजेंद्र जगताप, आमदार विजय काळे, डॉ. के.व्ही. प्रसाद, डॉ. प्रमोद रसाळ, आगम गर्ग उपस्थित होते.

डिपार्टमेंटमध्ये जाण्यास सोयीस्कर
कृषिमहाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. राजेंद्र जगताप यांनी विद्यार्थीदशेतील विविध आठवणी जागवल्या. ते म्हणाले, विद्यालयाच्या प्रशस्त आवारातील विविध विद्याशाखा विभागांमध्ये जाण्यासाठी सायकलींचा निश्‍चित उपयोग होईल. पूर्वी आम्हाला दूरच्या अंतरावरील डेअरी सायन्स डिपार्टमेंटमध्ये जाण्यास खूप अडचण अडचण यायची, मात्र आता सायकली उपलब्ध झाल्यामुळे ही अडचण येणार नाही. ही सायकल सेवा सार्वजनिक मालमत्ता असून विद्यार्थ्यांनी त्याचा चांगला वापर करावा. आपला वापर झाल्यानंतर इतरांनाही ही सेवा उपलब्ध करुन द्यावी. कृषि महाविद्यालय परिसर अधिक स्मार्ट करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी सर्वतोपरी सहकार्य करेल.

प्रदूषण टाळण्यासाठी व आरोग्य चांगले
आमदार विजय काळेही यांनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले. आजच्या घडीला प्रदूषण नियत्रंण व आरोग्यवृद्धी यासाठी विद्यार्थ्यांनी सायकलचा जरूर वापर करावा, असं काळे यांनी आवाहन केले. राजस्थानहून येथे कृषी शिक्षणासाठी आलेली आशा सास्त्या म्हणाली, प्रत्येकाने दुचाकीवर अवलंबून न राहता सायकलचा वापर केल्यास प्रदूषण टाळण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी फायदा होईल.