पिंपरी-चिंचवड : मेट्रोच्या कामासाठी मंगळवापासून पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत नाशिक फाटा ते खराळवाडीपर्यंत बदल करण्यात आला होता. परंतु वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने आणि दिवसभर वाहतूक कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर, हा फेरबदल तत्काळ मागे घेण्यात आला. बंद असलेला ग्रेडसेपरेटर पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
ग्रेडसेपरेटर होता बंद
पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू असून, पिलर उभारण्यात येत आहेत. नाशिक फाटा ते खराळवाडी दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे काम करण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यामुळे मंगळवारपासून महामार्गावरील वाहतुकीत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक फाटा ते पिंपरीपर्यंतचा ग्रेडसेपरेटर बंद ठेवण्यात आला होता.
बदलामुळे प्रचंड वाहतूक कोंडी
नाशिक फाट्यापासून निगडी, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने सेवा रस्त्यावर वळून पुढे खराळवाडीपर्यंत सेवा रस्त्यानेच सोडली जात होती. ग्रेडसेपरेटरचा मार्ग बंद करण्यात आल्याने ती सर्व वाहतूक सेवा रस्त्यांवर आली. परिणामी, मंगळवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी जाणवू लागली. कासारवाडी, नाशिक फाटा, शंकरवाडी, इंडियम कार्ड कंपनी, डेअरी फार्म, एच. ए. खराळवाडी आणि पिंपरी चौक या संपूर्ण मार्गावर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता. त्यामुळे बुधवारपासून ग्रेडसेपरेटरमधून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.