ग.स.सोसायटीसाठी उद्या मतमोजणी : निकालाकडे लागले जिल्हावासीयांचे लक्ष
सकाळी आठ वाजेपासून होणार मतमोजणी : मतमोजणीसाठी 79 टेबल
जळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी नोकरांची सोसायटीसाठी गुरुवार, 28 रोजी निवडणूक झाली होती. निवडणुकीनंतर आता मतदारांचे निकालाकडे लक्ष लागले असून शनिवार, 30 रोजी सकाळी आठ वाजेपासून जळगाव विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होईल. राज्यासह जिल्ह्यात प्रथितयश तसेच नावाजलेल्या सर्वात मोठ्या अशा जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटी निवडणूक मतदान प्रक्रिया 28 एप्रिल रोजी किरकोळ अपवाद वगळता पार पडली.
मतमोजणीसाठी 79 टेबल
या निवडणुकीत 32 हजार 44 सभासदांपैकी 25 हजार 390 सभासदांनी मतदान केले असून मतदानाची मतमोजणी प्रक्रिया कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवार, 30 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून केली जाणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी 79 टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी असे एकूण 653 कर्मचारी नियुक्त आहेत. या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करण्यात आल्याने मतमोजणी करण्यास सुमारे 8 ते 10 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.