घटस्फोटीत तरुणीवर सामूहिक बलात्कार

0

कोंढव्यातील धक्कादायक घटना; दोघांना अटक, एक फरार

पुणे : घटस्फोटीत विवाहिता रिक्षाने जात असताना रिक्षाचालकाने तिचे अपहरण करून कोंढव्यातील एका खोलीत नेले. तिथे त्याच्यासह अन्य दोन मित्रांनीही आळीपाळीने रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोघांना जेरबंद केले तर अन्य एकजण फरार झाला आहे. सतिश माने व बालाजी शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, आरोपींनी दारुच्या नशेत या तरुणीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची बाबही पोलिस चौकशीत उघड झाली आहे.

रागाच्या भरात घराबाहेर पडली, नराधमांच्या वासनेची शिकार झाली!
सविस्तर असे, की पीडित 23 वर्षीय तरुणीचा घटस्फोट झाला असून, ती येरवडा येथे तिच्या आईच्या घरी राहते. 13 डिसेंबरला संध्याकाळी तिचे भावाबरोबर भांडण झाल्याने रागात ती घराबाहेर पडली आणि रिक्षाने एनआयबीएम रोडवर आली. पतीबरोबर संपर्क साधण्यासाठी तिने तेथील एका सोसायटीच्या वॉचमॅनकडे मोबाइल मागितला. पण त्याने मोबाईलची बॅटरी लो असल्याने मोबाईल दिला नाही. तेथून ती चालत जात असताना एक रिक्षा आली. त्यात बसून तिने कोथरूडला जायचे असे सांगितले. तिला एकटीला पाहून रिक्षाचालकाने मित्राला फोन करून बोलावून घेतले. वाटेत तो मित्र आला. त्याने जबरदस्तीने कोंढव्यातील सिध्दार्थ नगरमधील एका खोलीत तिला नेले आणि तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. त्यानंतर रिक्षाचालकाने पीडितेला हडपसर येथील हांडेवाडी येथे एका खोलीत नेऊन दारु पाजण्याचा प्रयत्न केला व पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती कुणाला दिली तर ठार मारू, अशी धमकीही आरोपींनी तरुणीला दिली. बलात्कार केल्यानंतर आरोपींना आपल्याला कॅम्प परिसरातील एमजी रोडवर सोडून दिल्याची माहितीही पीडितेने पोलिसांना दिली होती. पीडित तरुणी येरवड्याकडे पायी जात असताना रात्रीच्या गस्तीवर पोलिसांना आढळून आली होती. तिची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.