घणसोली, तुर्भे विभागात अतिक्रमण विभागाची कारवाई

0

नेरुळ । नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलेले आहेत. त्यास अनुसरून आज घणसोली गावातील रहिवासी मारुती अंबोले यांचे सुरू असलेले अनधिकृत दुमजली तसेच नीलेश पवार यांचे तळमजल्याचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली, घणसोली विभागाचे विभाग अधिकारी राजेश ठाकूर, कनिष्ठ अभियंता रोहित ठाकरे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात 20 कामगारांच्या सहकार्याने 2 गॅस कटर व 3 ब्रेकरच्या साहाय्याने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत गुरुवार आठवडा बाजारावर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या बाजाराबाबत स्थानिक नागरिक यांचेकडून तक्रारी आल्या होत्या. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येत असून त्यासोबतच अनधिकृत फेरीवाले तसेच जागांचा गैरवापर करणार्‍यांवरही कारवाई होणार आहे.