माथेरान । आपल्याच स्वकष्टाने केलेल्या मेहनतीचे हक्कांचे पैसे घेण्यासाठीसुद्धा अनेकदा काम बंद आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याने शुक्रवारी घनकचरा व्यवस्थापन कामगारांनी सकाळपासून कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. चंद्रपूर येथील श्रीसाई बेरोजगार सेवा संस्थाचे ठेकेदार अभिजित नामपल्लीवार यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेका घेतला आहे. परंतु, अनेकदा कामगारांना पगार वेळेत मिळत नसल्याने त्यांना काम बंद आंदोलन केल्याशिवाय पगार दिला जात नाही, असे कामगारांचे म्हणणे आहे.त्यातच या सर्वच कामगारांनी स्वच्छता सर्वेक्षणातसुद्धा रात्रपाळीकरून डबल ड्युटी केलेली असून त्याबाबतचा पगारही मिळावा यासाठी हे कामबंद आंदोलन करण्यात आले. कामगारांनी स्वच्छता अभियानात दिवस रात्री कामे केलेली आहेत. त्याबद्दल रात्रपाळीचा पगारही त्यांना देण्यात यावा. त्यासाठी 12 तारीख रोजीच्या बैठकीत आम्ही कार्योत्तर मंजुरी दिलेली असून पुढील जनरल बैठकीत हा विषय प्रामुख्याने घेतला जाईल. तूर्तास सर्वच कामगारांना दोन्ही पगार देण्याबद्द्ल आम्ही मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप यांना सांगितले होते, असे यावेळी माथेरान नगरपालिका नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी सांगितले.
कामगारांच्या नियमित कामाचा धनादेश आम्ही ठेकेदाराला दिलेला असून स्वच्छता अभीयानात रात्रपाळी केलेल्या कामांचा पगार नगरपालिका सदस्यांची पुढील बैठक झाल्यावर काढण्यात येईल, असे यावेळी माथेरान नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप यांनी सांगितले. मे महिन्यात अध्यक्ष पदावर माझी नियुक्ती झाल्यापासून नेहमीच कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे. चार ते पाच किलोमीटर प्रवास करून हे कामगार रोजीरोटी साठी येतात. परंतु, त्यांना वेळेत पगारही दिला जात नाही, हे त्यांचे होत असलेले शोषण थांबले पाहिजे अन्यथा याबाबत आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.