जिल्ह्यातील चार नगरपरिषदांना प्रत्येकी 20 कोटी 41 लाख मंजूर
पुणे : राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील तळेगाव, दौंड, चाकण आणि राजगुरूनगर या चार नगरपरिषदांना निधी मंजूर केला आहे. सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ-निरोगी आणि राहण्यायोग्य करणे, सर्व नागरिकांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे, या उद्देशाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाने सुरू केली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने 32 शहरांसाठी 174 कोटी रुपयांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले होते. या प्रकल्पांसाठी केंद्र शासन व राज्य शासन एकत्रित खर्च करणार आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी राज्यासाठी केंद्र शासनाकडून 30 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झालेला आहे. ही निधी शासनाकडून 32 शहरांना वर्ग केला आहे. आता राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्याची 20 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे.