निगडी ः प्रतिनिधी – चिखलीतील घरकुल परिसरात वाढती गुन्हेगारी, दहशतीच्या निषेधार्थ तसेच विविध सेवा-सुविधांच्या मागण्यांसाठी घरकुलवासियांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर धडक मोर्चा काढला. चिखली घरकुलापासून ते पिंपरीतील महापालिका भवनापर्यंत पायी हा मोर्चा काढण्यात आला होता. या परिसरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रामुख्याने घरकुल परिसरात मागील काही दिवसांपासून गुंडगिरीमुळे दहशतीचे वातावरण आहेत. या भागात पोलिस चौकी आवश्यक असल्याने मध्यवर्ती ठिकाणी चौकी तातडीने सुरु करावी. तसेच परिसरात पथदिवे बसवावेत, मिळकत कर माफ करावा, नियमित स्वच्छता करावी अशा विविध मागण्यांसाठी घरकुलवासियांनी हा मोर्चा काढला होता. घरकुलवासियांच्यावतीने महापालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.