मुक्ताईनगर। गेल्या साडेतीन महिन्यांपासून घरकुलाचा दुसरा हप्ता व शौचालय अनुदान रखडल्याच्या कारणास्तव शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात जोंधनखेडा येथील महिला-पुरुषांनी गटविकास अधिकार्यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून तत्काळ रकमा अदा होतील या आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आले. मंगळवारी सकाळी गटविकास अधिकारी संजय बैरागी यांच्या दालनात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 35 ते 40 महिला-पुरुषांनी बैरागी यांना घेराव घातला.
ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर पडण्याची भिती
जोंधनखेडा येथील 35 घरकुलांचे काम दुसर्या टप्प्यापर्यंत पूर्ण झाले, तशा शिफारसी ग्रामसेवकातर्फे तीन महिन्यांपूर्वी देण्यात आल्या. तरीही घरकुलाचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याची तक्रार यावेळी केली. यासंदर्भात वारंवीार पंचायत समिती कार्यालयात येऊनही कामे होत नाहीत. त्यामुळे दुसर्या हप्त्याच्या अनुदानाअभावी घरकुलाचे काम प्रलंबित राहिले व ऐन पावसाळ्यात घरकुलाचे काम होत नसल्यामुळे संसार उघड्यावर आल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या. शौचालय पूर्ण झाले असताना अनुदानासाठी फिरवाफिरव होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. पाऊण तास घेराव घालून आंदोलन सुरु होते. सरपंच गोदावरीबाई किसन जाधव, शिवराम पवार, हकीम पठाण, दगडू साळुंके, रहिम खाँ, मंगलाबाई कोळी, सुभद्रा साळुंखे, फुलाबाई तडवी, सरदार तडवी, बाळू कांडेलकर, तालुकाध्यक्ष छोटू भोई, सुनील पाटील यांच्यासह 35 ते 40 ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेवक 15 दिवसांपासून गैरहजर
संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यावेळी गटविकास अधिकारी बैरागी यांच्यावर प्रश्नांचा भाडीमार केला. ग्रामसेवक मनोज घोडके हे 10 ते 15 दिवस येत नाहीत. त्यांच्या गैरहजरीमुळे ग्रामस्थांची कामे प्रलंबित असतात. ग्रामसेवकाची बदली करून नवीन ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी सरपंच यांनी केले.