साक्री । घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी याद्या तयार करण्याचे सांगून पैसे घेतलेल्या सरपंचांना यादीत नाव न आल्याने लाभार्थ्याने जाब विचारला. शिवाय पैसे परत मागितले याचा राग येऊन सरपंचांनी भर रस्त्यावर त्या लाभार्थ्यास मारहाण केल्याची घटना काल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक (देवळीपाडा) येथे घडली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत पिंपळगाव बुद्रूक येथे करण्यात येत होती. यावेळी सरपंचांनी यादीत नाव घेण्यासाठी म्हणून एकाकडून 5 हजार रुपये घेतले होते. मात्र प्रत्यक्ष यादी जाहीर झाली त्यावेळी त्या व्यक्तिचे नाव त्या यादीत नसल्याने काल सकाळी 11 वा.सदर इसमाने सरपंचांना गाठून याचा जाब विचारला असता नेहमीप्रमाणे सरपंचांनी या यादीत नसले तरी पुढच्या यादीत नाव येईल, असे सांगून त्या ग्रामस्थाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर व्यक्तिने सरपंचांवर विश्वास न ठेवता पैसेच परत मागितल्याने राग आलेल्या सरपंचाने भर रस्त्यात या ग्रामस्थाला काठीने झोडपून काढले.