घरकुल लाभार्थीं अनुदानाविना

0

मोखाडा (दीपक गायकवाड) । मोखाडा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींमधून विविध योजनांमार्फत शेकडो घरकुलांची कामे सुरू आहेत. परंतु पहिला, दुसरा टप्पा आणि अखेरचा टप्पा पूर्ण होऊनही तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना नियोजित अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे आदिवासी घरकुल लाभधारकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा झालेली आहे. बांधकाम साहित्य पुरवठादारांच्या तगाद्यामुळे लाभार्थ्यांना उजळ माथ्याने फिरणेही मुश्कील झाले आहे. मोखाडा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी 650, रमाई आवास योजना लाभार्थी 30, शबरी घरकुल आवास योजना लाभार्थी 232, आदिम कातकरी आवास योजना लाभार्थी 28, अशा एकूण 940 लाभार्थ्यांना योजनानिहाय लाभ देण्यात आलेला आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी लाभार्थ्यांना पहिल्या दुसर्‍या हप्त्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

जनधन खात्याची अनुदान लाभात अडचण
मोखाडा तालुक्यात जनधन योजनेअंतर्गत बहुतांश लाभार्थ्यांनी बिगर भांडवली खाते खोललेले आहेत. परंतु, हेच बिगर भांडवली खाते लाभार्थ्यांना अडचणीचे ठरलेले आहेत. या खात्यांमुळे असंख्य लाभार्थ्यांचे अनुदान जमा होत नाही. त्यामुळे या खात्यात 500 रु. भरून खात्यात परावर्तीत करून घेण्याच्या सूचना लाभार्थ्यांना केल्या जात आहेत. त्यातच या खात्यातून 10,000 इतकीच रक्कम उचलण्याची मर्यादा असल्याने असे खाते ही लाभार्थ्यांसाठी एकप्रकारे डोकेदुखी ठरलेली आहे.

कार्यवाही सुरू
याबाबत चौकशीकरिता प्रत्यक्ष प्रस्तुत शिर्षखाती कमी शिल्लक दिसत असल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत नसल्याचे मोखाडा पंचायत समितीच्या लेखा विभागाकडून सांगण्यात आले आहे. यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेतील 650 लाभार्थ्यींपैकी 173 लाभार्थ्यांच्या अनूदानाच्या रकमेला मंजूरी मिळाली असून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असून हफ्त्या दोन हफ्त्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होतील. असे विस्तार अधिकारी तुषार सुर्यवंशी यांनी सांगीतले आहे.

बांधकाम साहित्य पुरवठादारांचा तगादा
पहिला टप्पा, दुसरा टप्पा इतके काम झालेले आहे तर काही ठिकाणी पूर्ण बांधकाम झालेले आहे. परंतु, अनुदानाच्या भरवशावर उधार उसनवारी करून बांधकाम साहित्य उपलब्ध करून बांधकाम केलेले असल्याने बांधकाम साहित्य पुरवठादार आत्ता कमालीचा तगादा करत असल्याने बाजारपेठेतून उजळमाथ्याने फिरणेही मुश्कील झाले. असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच चंद्रकांत भोई यांनी दिली आहे. शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करून देऊन आमचे जगणे आणि खुलेआम फिरणे सुकर करण्याची मागणी भोई यांनी केलेली आहे.