घरकूल वाटप न केल्याने सहाय्यक आयुक्तांना सक्त ताकीद

0
पिंपरी : महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन प्रकल्पाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी अजंठानगर, मिलिंदनगर प्रकल्पातील घरकुलाचे वाटप अद्याप केलेले नाही, तसेच वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाबाबत तक्रारी प्रचंड वाढल्याने सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर कार्यरत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातून अजंठानगर, मिलिंदनगर येथील लाभार्थ्यांना अद्यापही घरकुलाचे वाटप केलेले नाही. वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी इंदलकरांना कारणे दाखवा नोटीस बजाविलेली आहे.
याबाबत इंदलकर यांनी नोटीसीला खुलासा सादर केलेला आहे. त्यात म्हटले की, लाभार्थ्यांचा सहभाग व प्रतिसाद असल्याशिवाय कामकाज पुर्ण होवू शकलेले नाही. लाभार्थ्यांनी अद्यापही स्वःहिस्याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे सदनिका वाटप प्रक्रिया राबविण्यास अडचण निर्माण होत असल्याचा खुलासा केला. परंतू, हा खुलासा संयुक्तिक व समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे इंदलकर यांनी घरकुलाचे वाटप प्रक्रिया राबविण्यास बराच विलंब व दिरंगाई करुन कर्तव्यात कसूर केली आहे.
तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 72 (क) भंग केल्याचे स्पष्ट होत आहे. यानुसार इंदलकराना सक्त समज देण्यात आली. याशिवाय भविष्यात कार्यालयीन कर्तव्य पालनात कसूल केल्यास शास्तीची कारवाई करण्यात येईल, त्याची सेवा पुस्तकांत नोंद घेण्यात यावी, असेही आयुक्त हार्डिकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.