घरपोच सिलेंडर देतांना वजनकाटा ठेवावा!

0

जळगाव । ज्या गॅसधारकास आपल्या गॅस सिलेंडरचे वजन करुन घेण्याची इच्छा असेल त्यांना वजन करुन घेता यावे यासाठी गॅस सिलेंडर घरपोच पुरविणार्‍या वाहनात वजनकाटा असावा. जेणेकरुन गॅसधारकास आपण घेत असलेल्या सिलेंडरच्या वजनाची करता येईल. अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी आज झालेल्या बैठकीत केली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली.

बैठकीत विविध विषरांवर केली चर्चा
या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मागील बैठकांमध्ये मांडलेल्या विविध विषयांवरील 23 तक्रारींचा आढावा घेण्यात आला. यापैकी 18 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तर उर्वरित तक्रारी सर्व संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधवी यांनी बैठकीत दिली. ज्या तक्रारींवर अद्याप कार्यवाही झाली नाही. त्या विभागांच्या विभाग प्रमूखास लेखी पत्र देण्याचे निर्देश श्री. गाडीलकर यांनी पुरवठा विभागास दिले. या बैठकीत अशासकीय सदस्यांनी अंजनी नदीची साफसफाई करणे, पारोळा शहरातील गटारींची साफसफाई करणे, रिक्षामधून अनाधिकृतरित्या होणारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक रोखणे, बस स्टॅन्ड व रेल्वे स्थानकावर लॉकर सुविधा उपलब्ध करुन देणे, अनाधिकृतरित्या वाहनांवर प्रेस लिहिणे यासह विविध उपयुक्त सुचना या बैठकीत मांडल्या. संबंधित विषय ज्या विभागाशी संबंधित असेल त्यांचेकडे पाठवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना श्री. गाडीलकर यांनी या बैठकीत दिल्या.

यांची होती उपस्थिती
या बैठकीस सदस्य सचिव तथा जिल्हापुरवठा अधिकारी राहूल जाधव, शासकीय सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अशासकीय सदस्य मंजुळा मुंदडा, विकास महाजन, सहीत्यीक अ.फ. भालेराव, बाळकृष्ण वाणी, सतीष गडे, बापू महाजन, उज्वला देशपांडे, विकास कोटेजा, सुरेश रोकडे, पुरवठा विभागाचे दांडगे आदी उपस्थित होते.