घरफोडीचे 16 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगारासह दोघे जाळ्यात
एक लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त : चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई
धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांनी घरफोडीचे तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या संशयीतासह त्याच्या साथीदााच्या मुसक्या आवळल्या असून चोरट्यांकडून कारसह एक लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. आरोपींनी माणिकनगरातील घरफोडीची कबुली दिली आहे. इम्रान बाचक्या शेख खालीद उर्फ कादीर मोहम्मद (27, अंबिका नगर, शोभा चव्हाण यांच्या घराजवळ, धुळे) व तौसीफ शहा उर्फ फैसल उर्फ सोहेल आरीफ शहा (18, जनता सोसायटी, कबीरगंज, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बाचक्या सराईत गुन्हेगार : चोरीचे 16 गुन्हे
धुळ्यातील महेंद्र बापूराव कापडे (49, माणिक नगर, धुळे) यांच्या बंद घरातून 11 फेब्रुवारी रोजी पहाटे 22 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला होता. चाळीसगाव रोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. अटकेतील बाचक्याविरोधात चोरीसह घरफोडीचे तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी, पितळी पातेले, परात, चांदीचे देव, सिलिंडर व तीन हजारांची रोकड मिळून एक लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक नितीन चौधरी, उपनिरीक्षक नासीर पठाण, हवालदार पंकज चव्हाण, हवालदार कैलास वाघ, नाईक एस.जी.कढरे, नाईक बाळासाहेब डोईफोडे, हेमंत पवार, स्वप्नील सोनवणे, चेतन झोलेकर, इंद्रजीत वैराट, प्रशांत पाटील आदींच्या पथकाने केली.