धुळे । शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लागला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक हेंमत पाटील यांच्या पथकाने चौघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीतांच्या ताब्यातून चोरीचे पाच मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एक लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सपोनि हेमंत पाटील व सपोनि डी.एन. खेडकर यांच्या पथकाने शिताफीने तपासाची चक्रे फिरवून ही कामगिरी पार पाडली. चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गेल्या 27 मार्च रोजी सदर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास करीत असतांना पथकाने संशयीत म्हणून अजय राजू वर्मा (वय 19) रा. रेल्वे स्टेशनरोड धुळे, राहूल काशिनाथ शेलार (वय 21) रा. श्रीराम नगर धुळे, सोनू ऊर्फ मोहन काशिनाथ सोनवणे (वय 17) रा. रेल्वे स्टेशन रोड, धुळे आणि आकाश ऊर्फ समाधान दगडू पवार (वय 17) रा. श्रीरामनगर धुळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. जप्त मुद्देमालात सॅमसंग कंपनीचा 0168 मोबाईल, ओप्पो, सॅमसंग जे-2, एम.आय., सोनी कंपनीचे मोबाईल आणि अपाची मोटारसायकल क्र. एम. एच. 18/ए.डी. 6145 किंमत 50 हजार रुपये आदींचा समावेश आहे.
आर्वीत घरफोडी करुन पळणार्याला पकडले
तालुक्यातील आर्वी गावात भरदिवसा घरात घुसून दोघा चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र घरमालकाची मुलगी वेळीच दाखल झाल्याने चोरटे पळत सुटले. त्याचवेळी प्रसंगावधान राखून सदर मुलीने आरडाओरड केली असता ग्रामस्थांनी पाठलाग करुन एकाला रंगेहात पकडले. त्याला तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 18 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राजेेंद्र शांताराम पाटील यांच्या भवानी चौकातील घरात दोन चोरटे शिरले. त्यांनी घराचा दरवाजा उघडून लोखंडी कपाटातून 1 ग्रॅम वजनाचे 30 तुकडे व अर्धा ग्रॅम वजनाचे 20 तुकडे असे 40 ग्रॅम सोने आणि 70 हजाराची रोकड असा दीड लाखांचा ऐवज हस्तगत केला. नेमकी त्याचवेळी घरमालकाची मुलगी घरी आली. तिने घरात पाहिले असता एक इसम तिला धक्का मारुन पळाला तर दुसरा मागच्या दाराने पसार झाला. हे पाहून त्या मुलीने आरडाओरड सुरु केली. काही लोक धावत आले त्यांनी चोरांचा पाठलाग केला. त्यावेळी चोरटा अन्वर खाँ नासीरखाँ पठाण रा. जामचा मळा चाळीसगाव रोड, धुळे हा पकडला गेला तर दुसरा विक्रम उर्फ विक्की मोहन चौधरी रा. मोहाडी हा मात्र पसार झाला.