चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी
चाळीसगाव – शहरातील आर के लॉन्स जवळील प्रेरणा सोसायटीतील घराचे कुलुप तोडुन घरातील 12 हजार 200 रुपयाची रोकड लांबवणा-या आरोपीस चाळीसगाव शहर पोलीसांनी काही तासातच रोख रकमेसह अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. अकबर अली कैसर अली (26) रा चाळीसगाव रोड धुळे असे या संशयिताचे नाव असून पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.
चोरलेली रक्कम हस्तगत
शहरातील देविदास तुळशीदास महाजन (54) हे आर के लॉन्स जवळील प्रेरणा सोसायटीत रहीवासी असुन ते वॉचमन म्हणुन काम करतात आज 11 रोजी सकाळी 8 वाजता ते भडगाव रोडवरील हेरंब बजाज शो रुमला कामाला गेले होते, तर त्यांची पत्नी सरलाबाई या सकाळी 10 वाजता शेतात कामाला गेल्या होत्या. काम आटोपून त्या दुपारी 2 वाजता घरी आल्या असता त्यांना त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले. त्यांनी घरात बेडरुम मध्ये पाहीले तेव्हा बेडरुम मधील लोखंडी पत्री पेटीत ठेवलेले 12 हजार 200 रुपये रोख अज्ञात चोरट्याने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान चोरुन नेल्याचे समजताच त्यांनी ही माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिली. याबाबत शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली असता एक तरुण धुळे रेल्वे लाईन कडे संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांना मिळाल्यावरुन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बछाव, उपविभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख, व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजेश घोळवे, हवालदार बापुराव भोसले, पोलीस नाईक राहुल पाटील, पो. कॉ. प्रवीण सपकाळे, तुकाराम चव्हाण हे धुळे रेल्वे लाईनकडे आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले असता अकबर अली कैसर अली याने पोलीसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास अटक केली. त्याच्याजवळून लोखंडी टॉमी व चोरी केलेले रक्कत हस्तगत करण्यात आली. त्याने वरील ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी देविदास महाजन यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.