घरफोडी करणारी टोळी जेरबंद; 9 गुन्हे उघड

0

हवेली । पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी चोर्‍या करणार्‍या टोळीतील तिघांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून उरुळीकांचन, मांजरी, खेड, कोरेगाव भिमा, तळेगाव दाभाडे, शिक्रापूर येथे केलेले घरफोडी चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

उरुळीकांचन येथील विशाल मुथा हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी रात्री घरफोडी करून 27 तोळे सोन्याचांदीचे दागिने व रोख बत्तीस हजार असा एकूण 6 लाख 14 हजार 560 रुपयांचा माल चोरून नेले. लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कोरेगाव भिमा येथे रात्री 2 वाजता मोबाइल शॉपीचे शटर उचकटून दुकानातील मोबाइल चोरून नेले होते. याचा तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून करणेबाबत पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी आदेश दिले होते.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, राजू मोमीन, पोपट गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, रवि शिनगारे यांच्या पथकास कोरेगाव भिमा येथील मोबाइल शॉपीतून चोरलेले मोबाइल थेऊरफाटा येथे विकण्यासाठी तिघेजण येणार असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचून धरतीपुत्र शंकर रजपूत उर्फ मन्नावत (26, रा. मावळे, सध्या रा.खामगावटेक), वासुदेव शंकर रजपूत (40, रा. उरुळीकांचन) व एका अल्पवयीन मुलासह एक मोटरसायकलसह ताब्यात घेतली. उरुळीकांचन कपड्याचे दुकान फोडल्याचे मांजरी येथील कपड्याचे दुकान, कोरेगाव भिमा मोबाइल शॉपी, खेड, तळेगाव दाभाडे, शिक्रापूर येथील किराणा दुकान येथे केलेले घरफोडी चोरीचे एकूण 9 गुन्ह्यांची कबुली दिली.