घरफोडी करणार्‍याला 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव । नविपेठेतील संजीवनी मेडीकल 2 फेब्रूवारीच्या रात्री अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना घडली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला आज मंगळवारी न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पंजाबराव देशमुख कृषकभवन जवळील संजीवनी मेडीकल अज्ञात चोरट्याने 2 फेबू्रवारीच्या रात्री फोडून ड्रॉव्हरमधून 40 हजारांची रोकड लांबविली होती. याप्रकरणी राजेश सुधाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून 3 फेबू्रवारीला जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पेठ पोलिसांनी याप्रकरणी सुनिल उर्फ सल्या लक्ष्मण पाटील (वय-30 रा. शनिमंदिरजवळ अमळनेर रोड पारोळा) याला आज मंगळवारी अटक केली. संशयित सल्या याने पोलिसांना चोरीतील चाळीस हजारांपैकी 20 हजार रुपये काढून दिले आहे. दरम्यान, आज त्याला न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. गोरे यांनी सल्या यास 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.