गणेशभक्त नंदू जाधव यांचा उपक्रम
शिरगाव : गणपती घरी यायचे म्हटले तरी सर्वांच्या आनंदाला पारावर उरत नाही. आपला बाप्पा सर्वात देखणा आणि त्यापुढील आरासही उत्तम असावी असे सर्वांनाच वाटते. आरास सर्वात चांगली व्हावी यासाठी जणू स्पर्धाच लागत असते. असेच गणेशभक्त नंदकुमार जाधव यांनी आपल्या घरातील बाप्पासमोर पंढरीच उभा केली आहे. कात्रज येथील गणेशभक्त व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जाधाव दरवर्षी आपल्या घरातील बाप्पासमोर अतिशय चांगला देखावा सादर करीत असतात. मागीलवर्षी त्यांनी गोदावरी, नर्मदा, यमुना, कावेरी, तापी, भीमा, आदी नद्यांचे पाणी आणून सप्तगंगा कलश बाप्पासमोर ठेवून आरास केली होती. त्यांच्या या संकल्पनेची संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व वाहिन्यांनी दखल घेतली होती. यावर्षी त्यांनी पंढरपूरचा हुबेहूब देखावा सादर केला आहे. यात चंद्रभागा नदी, पांडुरंगाचे मुख्य मंदिर, वाळवंट, पुंडलिकाचे मंदिर आदी सर्व जसेच्या तसे आपल्या घरात उभे केले आहे. गणपती पहावयास येणारा प्रत्येक भक्त कौतुक केल्याशिवाय राहत नाही.
हे देखील वाचा
दीड महिना करीत होतो प्रयत्न
त्यांच्या या अनोख्या कल्पनेविषयी विचारले असता जाधव यांनी सांगितले की, गणपती हे संपूर्ण महाराष्ट्रासह माझेही आराध्या दैवत आहे. मी हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. यावर्षी पंढरीतील बाप्पा आपण आल्या घरात स्थापन करावेत अशी कल्पना सुचली आणि लागलीच ती आमलात आणण्यासाठी प्रयत्न केले. पाहता पाहता माझ्या घरात खरच पांडुरंगाच्या गावातील बाप्पा अवतीर्ण झाले. हा देखावा करण्यासाठी मी गेले दीड महिना प्रयत्न करत होतो. शेवटी माझ्या संकल्पनेला मूर्त रूप आले आणि तेही संपूर्णपणे पर्यावरण पूरक. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा गणपती चांगला आहे असे पहावयास आलेले भक्त सांगतात. परंतु मला दोन्ही वर्षाचे सारखेच वाटतात. कारण दरवर्षी मी तेव्हढ्याच आनंदाने आरास करत असतो. यातून मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला जो आनंद मिळतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही. नंदकुमार जाधाव हे गेल्या 30 वर्षांपासून अखंडपणे पालखी प्रस्थानादिवशी सर्व भाविकांना देहूमध्ये भोजन देवून पांडुरंगाची सेवा करतात. संपूर्ण पालखीमध्ये पाण्याची व्यवस्था करतात. यावरून पांडुरंगावर आणि गणपती बाप्पावर असणारी जाधव यांची श्रद्धा लक्षात येते.