अग्निशमन विभागाची कामगिरी
हे देखील वाचा
पिंपरी : घराच्या गॅलरीमधून खाली पडलेली भांडी आणण्यासाठी आई गेली असता सतरा महिन्यांच्या मुलीकडून दरवाजा बंद झाला आणि ती आतमध्ये अडकली. घरात गॅस सुरु होता. त्यामुळे मुलीच्या जीवाला धोका जास्त होता. अशा अवस्थेतून संत तुकाराम नगर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलीची सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास कासारवाडी रेल्वे फाटकाजवळ घडली. कासारवाडी रेल्वे फाटकाजवळ सरिता अपार्टमेंट या वसाहतीमध्ये वाहिद खान यांचा पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वाहिद खान यांची पत्नी आलीता आणि मुलगी रिदा फातिमा दोघी घरात होत्या. आलीता दुपारी जेवण बनवत होत्या. त्यामुळे गॅस सुरु होता. एवढ्यात त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये ठेवलेली भांडी खाली पडली. खाली पडलेली भांडी आणण्यासाठी आलीता खाली गेल्या. त्यावेळी रिदा फातिमा ही सतरा महिन्यांची मुलगी एकटीच घरामध्ये होती. तिच्याकडून अचानक घराचा दरवाजा बंद झाला. आलीता भांडी घेऊन वरती आल्या असता घराचा दरवाजा उघडला नाही.
खान यांना याबाबत समजताच त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली. या माहितीवरून संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यात वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. काही वेळच्या कसरतीनंतर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अतिशय सावधानतेने दरवाजा कापून रिदा फातिमाला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही कामगिरी लीडर अशोक कानडे, अमोल चिपळूणकर, फायरमन सुशीलकुमार राहणे, अक्षय पाटील, प्रशांत पवार, विकास कुठे, महेश लांडगे, वाहनचालक प्रवीण लांडगे यांच्या पथकाने केली.