घरी बसण्याची वेळ आली तरी ओबीसींना खोटी आश्वासने भाजप देतेय – छगन भुजबळ

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा दुसरा टप्पा सुरू

सिन्नर : ओबीसींच्या मतांसाठी भाजप सरकार ७०० कोटींचा निधी जाहीर करतंय… अरे घरी बसण्याची तुमची वेळ आली आहे मग ७०० कोटी रुपये देणार कुठुन असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी सिन्नर येथील जाहीर सभेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची सुरुवात आजपासून नाशिक जिल्हयातून झाली. पहिली सभा सिन्नर येथे प्रचंड गर्दीमध्ये पार पडली. ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांची मुलुखमैदान तोफ नाशिकच्या बालेकिल्ल्यात आजही धडाडली.

ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अहो ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ओबीसींचे आरक्षण दिले आहे, असे सांगतानाच आज ओबीसींचे १७ टक्के आरक्षण राहिले आहे. तर ९ टक्केच नोकर्‍यांमध्ये आरक्षण भरलेले आहे अशी माहितीही आमदार छगन भुजबळ यांनी दिली.

सवर्णांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. परंतु हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका आहे. यांना साडेचार वर्षांत सूचलं नाही. परंतु पाच राज्यात फटका बसल्यावर ज्याला पाहिजे ते द्यायला हे सरकार तयार झाले आहे अशी टीकाही छगन भुजबळ यांनी केली. जे परिवर्तन होणार आहे ते सत्तेचे होणार नसून तुम्हा आम्हाला जे दु:ख आहे, अडचणी आहेत त्याबाबतचे परिवर्तन होणार आहे असे महत्त्वपूर्ण विचारही आमदार छगन भुजबळ यांनी मांडले. राज्य करण्याची यांची लायकी नाही. यांची लवकरच घर वापसी करा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.

खोटी आश्वासने देणार्‍यांना घालवून नव्याने परिवर्तन घडवूया – जयंतराव पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत सहभागी उध्दव ठाकरे यांनी चार वर्षात दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत.अशा लोकांना घालवून नव्याने परिवर्तन घडवल्याशिवाय गप्प राहायचं नाही असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सिन्नर येथे केले.

फ्रान्सने अत्याधुनिक असे f4k जातीचे विमान ५७० कोटी रुपयांना खरेदी केले. मग साडे सोळाशे कोटीची विमानं का खरेदी करण्यात आली. यामध्ये विशेष काय? असा सवालही आमदार जयंतराव पाटील यांनी केला. यावेळी राफेलचा मुद्दा घेवून जयंतराव पाटील यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

राज्यातील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. १६ मंत्र्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. स्वतःच्या राज्यातील जनित्रे खरेदी करण्याऐवजी बाहेरच्या देशातून महागडी वीज खरेदी केली आहे. सरकारने बनवलेली पॉवर स्टेशन बंद करण्याचा घाट सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज सरकारने चारवेळा महाग केली. गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे बेकारी वाढण्यासाठी ही कारणे महत्वाची आहेत असेही जयंतराव पाटील म्हणाले.

डोंबिवलीमध्ये भाजप उपाध्यक्षाच्या दुकानामध्ये दंगा करण्यासाठी १७० हत्यारे सापडली. बघा भाजपाचा हा चेहरा आहे. अहो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदाचे आदेश दिल्यामुळे हा प्रकार समोर आलाय असा आरोप करतानाच हा अडवाणींचा पक्ष राहिला नाही, तो सभ्य अमित शहांचा हा पक्ष आहे असा टोला आमदार जयंतराव पाटील यांनी लगावला.