विविध मंडळांनी केली देवीची प्राणप्रतिष्ठापना
शारदीय नवरात्रोत्सवास झाला प्रारंभ
पिंपरी-चिंचवड : धूप, अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध…जोडीला श्रीसूक्त पठण, कीर्तन, भजन…उदे गं अंबे उदेचा जयघोष अशा मंगलमय व भक्तिमय वातावरणात शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. शहरातील विविध मंडळांनी देवीची प्राणप्रतिष्ठापना करत शारदीय नवरात्रोत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला. देवीभक्तांमध्ये घटस्थापनेचा उत्साह होता.
अशी आहे दंतकथा
हे देखील वाचा
पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस माजला होता. त्याने देवदेवता, ऋषिमुनी, साधू संतांना सळो की पळा केले होते. तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. त्यांनी आपली समस्या देवांना सांगितली. त्या देवांच्या क्रोधातून एक शक्तिदेवता प्रकट झाली. त्या शक्तिदेवतेने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि ठार मारले. म्हणून त्या देवीचे नाव सर्वांनी महिषासुर मर्दिनी ठेवले. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजे नवरात्र. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ. नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. देवीपुढे अखंड दीप लावला जातो.
मंदिरांवर रोषणाई, दर्शनासाठी रांगा
प्रथेप्रमाणे घरोघरी घटस्थापना झाल्यानंतर महिलांनी देवीच्या दर्शनासाठी विविध मंदिरांमध्ये रांगा लावल्या. आकुर्डी तुळजाभवानी, निगडी- प्राधिकरण दुर्गादेवी (टेकडी), खराळआई, पिरंगाई (दापोडी), संतोषीमाता (नेहरूनगर), वैष्णोदेवी (पिंपरीगाव), काळेवाडी आणि चिखलीतील तुळजाभवानी, मोहटादेवी (थेरगाव) या मंदिरांमध्ये पहाटेपासून देवीची विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली. देवीचे अनोखे, तेजस्वी रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
दिवसभर ‘उदे गं अंबे उदे’चा घोष
घरोघरी देवीची मनोभावे पूजा करून घट बसविण्यात आले. तर, आदिमाया… आदिशक्तीच्या जागरास सुरवात झाल्याने विविध मंडळांमध्येही देवीची प्राणप्रतिष्ठापना करून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. बुधवारी दिवसभर देवीच्या नामाचा जयघोष सुरू होता. त्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते.