घर काम करणार्‍या अल्पवयीन मुलीला अमानुष मारहण :  दाम्पत्याविरोधात गुन्हा

Inhuman torture of a minor girl in Bhusawla Police case against the couple भुसावळ : प्रतिकुल परीस्थितीत संघर्ष करणार्‍या नाशिकमधील एका कुटुंबाने आपल्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला भुसावळातील एका दाम्पत्याला घर काम करण्यासाठी 50 हजार घेवून सुमारे दोन वर्षांपूर्वी पाठवले होते मात्र कामाच्या निमित्ताने दाम्पत्याने या चिमुकलीचा अमानुष छळ करून तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील सिंधी कॉलनीत घडली. कुटुंबापासून सुटका करीत या चिमुकलीने पळ काढून पोलिसांना आपबिती सांगितल्यानंतर शहरातील सिंधी कॉल्नीतील नरेश अठवाणी व राधा अठवाणी या दाम्पत्याविरोधात बाजारपेठ पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या चिमुकलीच्या माता-पित्यांची चौकशी करण्यात येणार असून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. बालिकेची जळगावातील बाल वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे.

50 हजार रुपये घेवून बालिकेला सोपवले
भुसावळातील अठवाणी दाम्पत्याने घर काम करण्यासाठी नाशिकमधील एका कुटुंबातील 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेला 50 हजार रुपये देवून शहरात आणले होते मात्र कुटुंबातील सदस्य घर काम करण्यासाठी बालिकेचा सातत्याने अमानुष छळ करीत मारहाण करीत होते मात्र बालिका निमूटपणे हा अत्याचार सहन करीत राहिली. बालिकेची घरची परीस्थिती जेमतेम असल्याने बालिकेने हा सर्व प्रकार आतापर्यंत सहन केला.

आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त करताच मारहाण
पीडीत बालिकेने नुकतीच आपल्या आई-वडलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता राधा अठवाणी यांनी मनाई केली तर शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी स्नानगृह (बाथरूम) स्वच्छ न केल्याने राधा अठवाणी यांनी अमानुष मारहाण केली व पीडीतेने कशीबशी सुटका करून घेत घरातून पळ काढला व जामनेर रोडवरून ती पळत असताना पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी बालिकेला आपल्या वाहनातून कार्यालयात नेत तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांच्या उपस्थितीत तिचा जवाब नोंदवण्यात आलल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भुसावळ बाजारपेठ पोलिसात नरेश अठवाणी आणि राधा अठवाणी (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस उपनिरीक्षक हरीष भोये करीत आहेत.