घर घेणाऱ्यांसाठी खुश खबर; दीड लाखांपर्यंत सूट

0

नवी दिल्ली: मोदी सरकार 2 च्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांना दिलासादायक असा हा अर्थसंकल्प राहिला.

४५ लाख किंमतीचे घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बांधकाम क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याचा यातून प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांचा वर्षाव करतानाच घर खरेदीतीही दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी सूट २ लाखाहून ३.५ लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २.५ लाखापर्यंतची इलेक्ट्रीक वाहन खरेदीवरही मोठी सूट देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बांधकाम क्षेत्राची पिछेहाट होत होती. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. प्रत्येक गावात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात येणार आहे.