पहुर : पहूर पेठ येथे मध्यरात्री दोघा चोरट्यांनी एकाला टॉयलेटमध्ये कोंडून जबरीने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मिळून 48 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या संदर्भात पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीने उडाली खळबळ
सुधीर सुकलाल पाटील (39, रा.होळकर नगर, पहूर पेठ, जामनेर) यांचे कापड दुकान असून ते भाड्याच्या घरात राहतात. गुरूवार, 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आवाज आल्याने सुधीर पाटील यांना जाग आल्यानंतर चोरट्यांनी सुधीर पाटील यांना धमकी देवून टॉयलेटमध्ये कोंडून दिले व घरातील लोखंडी कपाटातून 48 हजार 300 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवली. याबाबत सुधीर पाटील यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.