जळगाव । सामाईक असलेले घर खाली करण्याच्या कारणावरून बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास दाम्पत्यास तिघांनी बेदम मारहाण करत एकाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केल्याची घटना खडके चाळ परिसरातील सैनिक पिठाची गिरणीजवळ घडली. दरम्यान, जखमी पती-पत्नीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले असून मारहाण करणार्या तिघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिवीगाळ केल्याचा जाब विचारताच केली मारहाण
शेख इस्माईल शेख गफुर (वय-40) हे खडके चाळ परिसरातील सैनिक पिठाची गिरणी जवळ पत्नी मुमताज बी व मुलांसह राहतात. बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास शेख इस्माईल यांच्या वहिणी सोफिया बी या त्यांच्या घरी आल्यानंतर हे घर माझ्या पतीचे असून तुम्ही घर खाली करून द्या असा तगादा लावत घराबाहेर येवून शेख इस्माईल व त्यांच्या पत्नसी यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी त्या ठिकाणी पुतण्या अरबाज शेख रज्जाक व आसिफ शेख रज्जाक हे दखील उपस्थित होते. शेख ईस्माईल यांनी शिवीगाळ करू नका असे सांगितल्यावर सोफिया बी यांनी रागाच्या भरात घराबाहेर पडलेला लोखंडी पाईप उचलून शेख इस्माईल यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव होवू लागला. यानंतर अरबाज शेख रज्जाक व आसिफ शेख रज्जाक यांनीही ईस्माईल यांच्या गरोदर पत्नी मुमताज बी यांच्या पोटावरही मारहाण केली. त्यानंतर शेख ईस्माइल यांनी लागलीच पत्नीला सोबत घेवून शहर पोलिस स्टेशन गाठत तिघांविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर ईस्माइल शेख यांच्या फिर्यादीवरून पुतण्या अरबाज शेख रज्जाक व आसिफ शेख रज्जाक तसेच वहिणी सोफिया बी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या दाम्पत्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले.