घाऊक बाजारात जुन्या व नवीन कांद्याची आवक; दर मात्र चढेच

0

शेतकरी व ग्राहक या दोघांनाही दरवाढीचा फटका

पुणे : घाऊक बाजारात जुन्या आणि नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. जुना कांदा बाजारात उपलब्ध आहे. कांद्याला चांगले भाव मिळतील, या आशेने शेतकर्‍यांनी अधिक प्रमाणात कांदा साठवला होता. मात्र साठवणुकीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली आहे. एककीडे दर मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना फटका बसत असताना दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी होऊनही ग्राहकांना मात्र प्रतिकिलो 15 ते 20 रुपये या दरानेच कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनाही वाढीव दराचा फटका बसत आहे.

शेतकर्‍यांच्या पदरी निराशा

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात शुक्रवारी दीडशे ते पावणेदोनशे ट्रकमधून कांद्याची आवक झाली. घाऊक बाजारात जुना आणि नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. जोपर्यंत बाजारातील जुन्या कांद्याचा पुरवठा कमी होत नाही तोपर्यंत नवीन कांद्याला भाव मिळणार नाही. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती. घाऊक बाजारात अपेक्षेएवढे भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली आहे, असे घाऊक बाजारातील कांदा व्यापारी विलास रायकर यांनी सांगितले.

20 दिवस जुन्या कांद्याची आवक

शेतकर्‍यांच्या अपेक्षेएवढा हा भाव नाही. जुना कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जुना कांदा खरेदी करताना कांदा निवडून घ्यावा लागतो. जुन्या कांद्याची आवक थांबल्यानंतर नवीन कांद्याला मागणी वाढेल आणि त्यानंतर कांद्याला भाव मिळेल. पुढील 15 ते 20 दिवस जुन्या कांद्याची आवक सुरू राहील, तोपर्यंत कांद्याला अपेक्षेएवढा भाव मिळणार नाही, असेही रायकर यांनी सांगितले.

जुन्या कांद्याला

उपाहारगृहचालक, खानावळ- चालकांकडून मोठी मागणी असते. जुना कांदा सामिष पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो. नाताळात जुन्या कांद्याला मागणी वाढेल. सध्या जुन्या कांद्याला प्रतिकिलो 7 ते 8 रुपये भाव मिळत आहे.