नवी मुंबई : रहिवाशी वापर असलेल्या इमारतीत प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून रुग्णालयाचे काम सुरूच ठेवल्याने घाटकोपर येथील दामोदर पार्क मधील सिद्धीसाई ही चार मजली इमारत पूर्णपणे कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत 17 रहिवाशांचा मृत्यु झाला. मात्र अशीच परिस्थिती नवी मुंबई शहरात असून अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने कामे सुरु आहेत. अशा कामांकडे प्रशासनाचा कानाडोळा असल्याने घाटकोपरच्या धर्तीवर नवी मुंबई शहरात घटना नाकारता येत नाही.
सिद्धीसाई इमारतीच्या तळमजल्यावर अनधिकृतपणे हॉस्पिटलचे काम सुरु होते. कुठलीही परवानगी न घेता इमारतीच्या आराखडा बदलून सदर काम सुरु होते.आराखड्यात मंजूर झालेल्या नकाशात मनाप्रमाणे बदल करून इमारतीच्या सुरक्षेला व मजबुतीला धोका निर्माण करण्याचे व निष्पाप लोकांचे बळी घेण्याचे काम घाटकोपरच्या घटनेत समोर आले. पैशांसाठी कितीही चुकीचे काम असले तरी सरकारी अधिकार्यांच्या मदतीने लोकांच्या जीवाशी खेळण्याचे होत आहे.कोपरखैराणेतील माथाडी वस्तीत असा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
पालिका, सिडकोची भीती नसलेल्या काही माथाडी घरमालकांनी आपली बैठी घरे तीन ते चार मजली इमारतीत परावर्तित करताना बांधकामांचे कुठलेही नियम न पाळता इमारती बनविल्या आहेत.तर नेरूळ मधील सेक्टर 10 परिसरात एल आयजी मध्ये तर रहिवाश्यांनी जी + 5 चे बांधकाम केले आहे,बहुतांश एलआयजी या वाणिज्य वापरासाठी देण्यात आल्याने याची कोणतीही पडताळणी प्रशासनाकडून होतांना दिसत नाही.
रेल्वे स्थानक,मेन रोड,चौक लगत असलेल्या रस्त्यांवर रहिवाशी वापरासाठी असलेल्या इमारतींमध्ये सर्रास वाणिज्य वापर होतांना दिसत आहे.मात्र अश्या अनधिकृत कामांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याने भविष्यात घाटकोपर च्या धर्तीवर होणारी घटना नाकारता येत नाही.अनेक ठिकाणी घरमालकांनी आपली घरे तळमजल्यात दुकाने तर वरचे मजले भाड्याने दिलेत.
स्वतः मालक एका खोलीत वास्तव्यास असतो. ह्या वस्त्यांमध्ये दुकाने, दवाखाने, लॅबोरॅटरी, क्लिनिक, मेडिक, फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग सारखे धंदे खुलेआम सुरु आहेत. काही ठिकाणी तर तीन ते चार मजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स चालू आहेत. पालिकेच्या आरोग्य खात्याचे हॉस्पिटल्ससाठी असलेले नियम, निकष सर्व पायदळी तुडवून, अधिकार्यांना मॅनेज करून रुग्णांना लुबाडून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा गोरखधंदा खुले आम सुरु आहे. इमारत तीन ते चार किंवा त्याहून अधिक मजले बांधायचे असल्यास त्या इमारतीचा पाया किती आकाराचा, किती खोल असावा याची नियमावली आहे. पण ते सर्व नियम गुंडाळून कथित भूमाफिया विकासक केवळ पैश्यांसाठी इमारती बांधून देत आहेत. माथाडी वस्त्यांमधील इमारतींप्रमाणे शहरातील गावठाणांमध्ये फिफ्टी फिफ्टी तत्वावर अनेक उंच इमारती सहा ते नऊ महिन्यात बांधून पूर्ण करून त्यातील घरे निरपराध लोकांना विकून ही मंडळी नंतर गायब होतात. अनधिकृतपणे बांधलेल्या ह्या इमारतींना वीज, पाणी व इतर सुविधा नियमानुसार दिल्या होत्या का ? याची उत्तरे आज न शोधल्यास येणार्या भविष्यात नवी मुंबईतही घाटकोपरसारखी दुर्दैवी अपघाती घटना घडल्यास नवल वाटू नये.