मुंबई – साकिनाका येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मंगळवारी सुमारे तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्याची कारवाई केली असताना बुधवारी रात्री घाटकोपर पोलिसांनी अशाच एका कारवाईत सहाजणांना अटक केली. या सहाजणांकडून पोलिसांनी सुमारे दोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. दोन दिवसांत चौदा आरोपींना अटक करुन पोलिसांनी सुमारे सव्वापाच कोटी रुपयांचे जुन्या नोटा जप्त केल्या आहे. नोटबंदीनंतर चालू वर्षांतील ही आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई कारवाई असल्याचे बोलले जाते.
मंगळवारी साकिनाका परिसरात काहीजण जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा घेण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी साकिनाका येथील चौग्राह इस्टेट कंपाऊडजवळ सापळा रचून आठजणांना अटक केली होती. त्यात अब्दुल समद अन्सारी, गिरीश मनीलाल शहा, विनोद खिमजी संघवी, मुकेश त्र्यंबकलाल मेहता, फारुख कल्लू शेख, अन्वरअली शेख, डॉ. रेमंड जोसेफ डिमेलो, साकिब फिरोज शेख अशी यांचा समावेश होता. या आठही आरोपींकडून पोलिसांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या 3 कोटी 13 लाख 35 हजार 500 रुपयांच्या जुन्या जप्त केल्या होत्या. अटकेनंतर त्यांना येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना या गुन्ह्यांतून डिस्चार्ज करण्यात आले होते. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर घाटकोपर येथील बसडेपोजवळ काहीजण जुन्या नोटा घेऊन येणार आहे. संबंधित तरुण एका एजंटच्या मदतीने जुन्या नोटा देऊन नवीन नोटा घेणार आहे. या माहितीनंतर घाटकोपर पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे सापळा रचून टॅक्सीतून आलेल्या सहाजणांना अटक केली. या सहाजणांकडून पोलिसांनी एक कोटी नव्वद लाख रुपयांचे जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. त्यात पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी विशेष कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.