पिंपरी : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय श्री. श्री. घारे यांचा अर्धपुतळा बसविण्यात यावा, तसेच महापालिका हद्दीतील स्वातंत्र्यसैनिकांची नावे क्रांतीवीर चापेकर बंधू समुहशिल्पावर कोरण्यात यावी अशा मागण्या सामाजिक कार्यकर्ते मदन जोशी यांनी केल्या आहेत.
याबाबत महापालिकेला त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, स्वर्गीय घारे हे पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. अत्यंत व्रतस्थ आयुष्य जगलेल्या घारे यांची महती आणि माहिती पुढच्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचा अर्धपुतळा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बसविणे, तसेच पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात लावणे गरजेचे आहे. त्यामुळे आयुक्तांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून या दोन्ही गोष्टी कराव्यात.