नवी दिल्ली: मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेले दिल्लीतील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षावर आरोपांचा भडिमार सुरूच ठेवला आहे. दिल्लीतील एका घोटाळ्यातील संशयित आरोपीने आप नेते संजय सिंह आणि प्रवक्ते आशुतोष यांना रशिया दौरा घडवून आणल्याचा नवा आरोप मिश्रा यांनी केला.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याने संतापलेल्या कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि ‘आप’वर आरोपांचा भडिमार सुरूच ठेवला आहे. दिल्लीत वर्षभरापूर्वी नंबर प्लेट घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यातील संशयित आरोपीने संजय सिंह आणि आशुतोष यांच्या रशिया दौर्यासाठी खर्च केल्याचा आरोप कपिल मिश्रांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शीतल सिंह हा उच्च सुरक्षा असलेल्या नंबर प्लेटच्या व्यवसायात सक्रिय आहे. दिल्लीत बहुचर्चित नंबर प्लेट घोटाळ्यात शीतल सिंहचा समावेश असल्याचा संशय आहे.
‘नंबर प्लेट घोटाळ्यातील कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस आम्ही केली होती. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आमच्याच समितीने केली होती’ असे कपिल मिश्रा यांनी सांगितले. असे नेमके काय झाले की, या कंपनीचे कंत्राट रद्द झाले नाही, याउलट कंपनीतील पार्टनर शीतल सिंह हे आप नेत्यांसह रशियाला गेले असा मुद्दा कपिल मिश्रांनी उपस्थित केला. केजरीवाल त्यांच्या पाच नेत्यांच्या परदेश दौर्यावर मौन बाळगून बसले आहेत आणि माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा आरोप होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कपिल मिश्रांनी माफीदेखील मागितली. ‘मी केजरीवालांचा आंधळा भक्त होतो आणि त्यावेळी यादव आणि भूषण यांच्याविषयी जी विधाने केली. त्यासाठी मी दोघांचीही हात जोडून माफी मागतो. या दोघांनी माझ्यासोबत यावे’ असे आवाहन त्यांनी केले. ‘लेट्स क्लीन आप’ या अभियानाचीही त्यांनी याप्रसंगी घोषणा केली. केजरीवाल हे हवाला व्यापार करतात असा आरोप कपिल मिश्रांनी केला आहे.