घोडा मैदान दूर, तरीही…

0

महापालिका निवडणुकीत सपाटून मार बसल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना एकदम गारठून गेली आहे. शहरामध्ये त्यांचा एक खासदार, एक आमदार असताना तुमचे नगरसेवक किती हो? या प्रश्‍नावर खाली मान घालावी, अशी स्थिती आहे. कारण भाजपने खासदारांच्या घराच्या आसपासचा परिसरही सोडला नाही. सगळा सुपडासाफ केला आहे. साहजिकच भाजपचे शहराध्यक्ष-आमदार लक्ष्मण जगताप यांची कॉलर अधिक टाइट आहे. त्यामुळे ते आपले राजकीय शत्रू खासदार श्रीरंग बारणे यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांना निमित्तच हवं असतं.

आताही तेच झालं-मातोश्रीवर सोमवारी झालेल्या बैठकीत खासदार बारणे व आमदार नीलम गोर्‍हे यांच्यात वाद झाला. तो अशासाठी झाला की, काही दिवसांपूर्वी गोर्‍हे यांनी जगतापांना भेटून भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवावी असे सुचवले होते. यातूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच बारणे उसळले, गोर्‍हे रडल्या, दुसर्‍या दिवशी पुन्हा सर्वकाही शांत. त्यामुळे संपला विषय. मात्र, पटाईत जगतापांनी त्यातही कारण शोधलं आणि तुमच्या वादात माझं नाव का घेतलं? असं म्हणून बारणेंवर तोफच डागत 2019ची लोकसभा सेनेतर्फे लढवून दाखवावीच असे आव्हान दिले. आता या दोघांमध्ये जोरदार पत्रकबाजी सुरू आहे. त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी मात्र भरपूर मनोरंजन होत आहे. आता आपण लोकांची करमणूक करायची की कामे करायची? हे ज्याचे त्याने ठरवावे.
-अविनाश म्हाकवेकर, पिंपरी-चिंचवड