घोडेगावात विहिरीच्या पाण्यावरून तिघांना बेदम मारहाण

भुसावळ/जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे वडिलोपार्जित सामाईक विहिरीचे पाणी वापरण्यावरून तिघांना जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांविरोधात गुन्हा
चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथील किसन पेला राठोड यांचे भाऊ धनराज पेला राठोड यांच्या घोडेगाव शिवारातील शेतात वडिलोपार्जित सामाईक विहिर आहे. मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास विहिरीचे पाणी वापरण्यावरून किसन पेला राठोड, पत्नी संगीता किसन राठोड व मुलगा ज्ञानेश्वर किसन राठोड यांना शिविगाळ करून लाकडी काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यापैकी विकास दशरथ पवार, रामेश्वर धनराज राठोड व संदीप दशरथ पवार अशांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्यांनी किसन पेला राठोड यांच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली. त्यात मुलगा ज्ञानेश्वर सोडविण्यासाठी गेला असता धनराज पेला राठोड यांनी लाकडी दांड्यांनी मारहाण केली तर दशरथ काळू पवार यांनी ज्ञानेश्वर राठोड यास धरून ठेवल्याने त्यावेळी फिर्यादीची आई संगीता किसन राठोड हिला ज्योती रामेश्वर राठोड यांनी चापट बुक्क्यांनी मारहाण केली.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी ज्ञानेश्वर किसन राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात धनराज पेला राठोड, विकास दशरथ पवार, रामेश्वर धनराज राठोड, संदीप दशरथ पवार, ज्योती रामेश्वर राठोड व दशरथ काळू पवार (सर्व रा.घोडेगाव, ता.चाळीसगाव) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहेत.