घोषणा आंतरराष्ट्रीय महामार्गाची…काम होतंय राज्य मार्गाचे…

0

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केलेल्या चार राष्ट्रीय महामार्गापैकी महाराष्ट्राच्या हद्दीतून जाणार्‍या एका महामार्गाचे काम चौपदरीकरण न करता ते दुपदरीकरण केले जात आहे. यामुळे अन्याय होत असल्याची भावना धुळे,नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांची बनली आहे. घोषणा आंतरराष्ट्रीय महामार्गाची आणि काम होतेय राज्य महामार्गाचे असे चित्र यामार्गावर पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी फाटा ते अंकलेश्‍वर 753ल हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्राच्या हद्दीत मात्र दुपदरी तर गुजरात हद्दीत चौपदरी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या या कामाचा अजब गजब प्रकार नागरिकांच्या समजण्यापलीकडे आह. नवापूर येथील कार्यक्रमात ना. नितीन गडकरी यांनी 4 राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली होती. त्यातवरील 753 ल या राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश होता.

धुळे ते शेवाळीसह याभागातील लोकांना दळण वळण व व्यापारासाठी गुजरात राज्यात जाण्याकरीता व्यारा मांडवी, नेत्रंग मार्गाने अंकलेश्‍वरला जावे लागत होते. तो त्रास व अंतर वाचवण्यासाठी शेवाळी फाटा, निजामपूर ,नंदुरबार अक्कलकुवा, मार्गाने सागबारा नेत्रंग होत थेट अंकलेशवरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचा पहिला टप्पा शेवाळी ते सिंदबनपर्यत आहे. परंतु, या भागातील नागरीकांच्या हरकती मागवण्यात आल्या. माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनीही हरकत घेतली आहे. शेवाळी ते सीनबन या महामार्गालगतच्या जमिनी कोरडवाहू आहे. शिवाय या भागात सोलर आणि सुझलोंन सारखे मोठे प्रकल्प आहेत. असे असतांना या मार्गावर चौपदरीकरण न करता दुपदरीचे काम सुरू आहे. तळोदा तालुक्यातील काही भागातून हा मार्ग जाणार आहे तेथून चौपदरीकरण केला जाणार आहे. यामुळे आदिवासी बांधवाच्या जमीनी कमी होऊन ते अल्पभूधारक होतील असा आक्षेप त्यांनी नोंदविला होता. ही सुनावणी नंदुरबार येथे राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता वर्षा अहिरे–पवार यांच्याकडे झाली. मूळात ह्या मॅडम साक्री तालुक्याचे विद्यमान आमदार डी.एस.अहिरे यांच्या कन्या आहेत असो हा भाग वेगळा. परंतु, हा राष्ट्रीयमार्ग महाराष्ट् हद्दीत दुपदरी असणार आहे, आणि जेथून गुजरात हद्द सुरु होईल तेथून चार पदरी असणार आहे. बहुतेक वेळा असे उदाहरण कमी पहायला मिळतात. याला दुर्दैव म्हणावे लागेल.

हा नावाला राष्ट्रीय महामार्ग आणि महाराष्ट्र हद्दीत राज्य मार्ग आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, शेवाळी ते सीनबन या मार्गावर ट्राफिक काऊंटिंग करण्यात आले आहे. या मार्गावर धावणार्‍या वाहनांची संख्या कमी आढळून आली म्हणून या मार्गावर चौपदरी न करता दुपदरी करण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अधिकार्‍यांच्या या म्हणण्याला सामाजिक कार्यकर्ते पंडित आबा बेडसे यांनी खोडुन काढत वस्तुस्थिती समोर आणली आहे. बेडसे यांचे म्हणणे आहे की ना. नितीन गडकरी यांनी घोषित केलेल्या शेवाळी फाटा ते सिनबन या पहिल्या टप्प्यातील मार्गावर आंतरराष्ट्रीय दोन मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात विविध कामांसाठी येणार्‍या वाहनांची संख्या जास्त आहे. मोठं मोठे अवजड वाहने येत असतात. त्यामुळे या मार्गावर दुपदरी नव्हे तर चौपदरी करण होणे आवश्यक आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही. यामार्गावर वाहनांची वर्दळ कमी आहे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. परंतु, रस्ताच चांगला नसल्याने या मार्गावर वाहने धावतील तरी कसे असा प्रश्‍न पंडीत बेडसे यांनी उपस्थित केला आहे. शेवाळी ते सीनबन या महामार्गावर चौपदरीकरण झाल्यास गुजरात राज्यातील अंकलेशवर जाण्यासाठी सोयीचा होणार आहे. शिवाय 150 किलोमीटर चे अंतर देखील कमी होणार आहे. हीच बाब कुणाच्या लक्षात येत नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतून जाणार्‍या या महामार्गाच्या कामाला वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. माझ्यासारख्या एका सामन्य माणसाला ही बाब समजू शकते, पण ती अधिकार्‍यांना किंवा पुढार्‍यांना का समजत नाही, असा सवाल या मार्गावर छडवेल गावातील सामाजिक कार्यकर्ते पंडित आबा बेडसे यांचा आहे. विशेष म्हणजे जेथून हा महामार्ग सुरवात होते तो भाग आणि उर्वरीत भाग नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतो. विद्यमान खासदार हिनाताई गावीत या सत्ताधरी पक्षाच्या आहेत हे विशेष. आता जर हा महामार्ग चौपदरी करण झाला नाही तर भविष्यात कदापीही तो शक्य नाही म्हणून धुळे नंदूरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

रवींद्र चव्हाण, नंदुरबार
9423194841