पुणे । आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र याच तरुणाईस आज स्वत:च्या आई-वडिलांकडे पाहण्याइतपतही वेळ नाही. चंगळवादाच्या आहारी जाणार्या या पिढीने खरेतर ऋषितुल्य व्यक्तींचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावयास हवा. यामुळे नक्कीच चंगळवादाला आळा बसेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. विश्व शांती केंद्र, एमआयटी व शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने 14 ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार एमआयटीच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित केला होता. यावेळी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. शां. ब. मुजुमदार, सागर डोईफोडे, प्रा. राहुल कराड, पं. वसंत गाडगीळ, श्रीवर्धन वसंत गाडगीळ हे उपस्थित होते.
मंगेश तेंडुलकर यांना मरणोत्तर पुरस्कार
योगी ज्ञाननाथ रानडेमहाराज, रामकृष्ण गोविंद देशपांडे, प्राचार्य एच. एम. गणेशराव, प्राचार्य रामचंद्र पांडे, डॉ. गोविंद स्वरूप, श्रीकांत मोघे, शरद भिडे, पृथ्वीराज बोथरा, प्रभाकर जोग, निर्मलादेवी पुरंदरे, हभप तुळशीराम कराड, महादेव पाटील, अॅड. अनंत कुकडे या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार केला गेला. तसेच हास्य व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला.
परंपरेचे आगळे-वेगळे स्वरुप
आपले त्यांच्याबद्दल असणारे प्रेम, आपुलकी, आत्मीयता त्यांच्यापर्यंत पोचणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता वाढेल. डॉ. कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे आगळे-वेगळे स्वरूप समोर आणणारा हा ऋषिपंचमीचा उत्सव आहे.