मुंबई : प्रतिनिधी : व्हिडिओकॉनला कर्ज देताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी सीबीआय करणार होती. त्यानुसार ही चौकशी सुरु करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉनला कर्ज देताना कथित भ्रष्टाचार केला असा आरोप काही दिवसांपासून करण्यात येत आहे.
धूत-कोचर यांची कंपनी
व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी 2008 मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या 9 लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कोचर यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे.
3250 कोटी रुपये कर्ज मंजूर केले
बँकेच्या संचालक मंडळाने चंदा कोचर यांची भूमिका योग्य असल्याचे म्हणत त्यांना क्लीनचिट दिली आहे. व्हिडिओकॉन ऑफ लेंडर्सला 3250 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले होते. व्हिडिओकॉन समूहाला कर्ज मंजूर करणार्या समितीमध्ये चंदा कोचर यांचा समावेश असला तरी ती त्यांची एकट्याची जबाबदारी ठरत नाही, अशा शब्दात बँकेने कोचर यांचा बचाव केला आहे. अशात आता चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी करण्याचे सीबीआयने ठरवले आहे.