पीएनबी घोटाळा : गीतांजलीच्या विपुल चितालियाचीही चौकशी
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 12,636 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना चौकशीसाठी बोलावले होते. कोचर यांच्यासहित अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. गीतांजली ग्रुपला कर्ज वितरित केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, चंदा कोचर मंगळवारी सीबीआय कार्यालयात आल्या होत्या. सीबीआयने मंगळवारी घोटाळ्याशी संबंधित तपासासाठी गीतांजली ग्रुपचे बँकिंग व्यवहार सांभाळणारे उपाध्यक्ष विपुल चितालिया यांचीही चौकशी केली. विपुल बँकाँकवरुन परतले असता सीबीआयने मुंबई विमानतळावरुनच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चितालियाला विमानतळावरूनच उचलले
पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी सीबीआयने गीतांजली समूहाचा उपाध्यक्ष विपुल चितालिया याला सीबीआयने ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. तिथून त्याला वांद्रे-कुर्ला संकुलातील सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. विपुलचा या घोटाळ्याशी नेमका काय संबंध होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. हिरा व्यापारी नीरव मोदीसोबत मेहुल चोकसीवर 12,636 कोटींच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोप आहे. याच घोटाळ्यात अतिरिक्त 1300 कोटींचा घोटाळा झाल्याचा खुलासा 26 फेब्रुवारीला झाला होता. सीबीआयने गीतांजली ग्रुपविरोधात 4,886.72 कोटींची फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा 15 फेब्रुवारीला दाखल केला होता.
कराराचे नूतनीकरण न करण्याचा विराटचा निर्णय
नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 12,600 कोटींचा घोटाळा केल्यानंतर बँकेची प्रतिमा चांगलीच मलीन झाली आहे. या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांच्या ठेवींना कोणताही धोका नाही, असे बँकेकडून आश्वस्त करण्यात आले होते. परंतु, या सगळ्यामुळे बँकेची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट हा बँकेचा सदिच्छादूत आहे. मात्र, नुकत्याच उघड झालेल्या घोटाळ्यामुळे विराटने ही भागिदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या क्रिकेट एजन्सीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली. विराटने यापुढे बँकेसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्याच्या कराराची मुदत संपेपर्यंत विराट त्यांच्यासोबत असेल.