चंदू चव्हाण सुखरूप परतल्याने धुळ्यात आनंदोत्सव

0

धुळे ।सर्जीकल स्ट्राईक नंतर चुकून भारताची सिमा ओलांडून पाकिस्तानीा लष्करच्या हातात सापडलेला जवान चंदू चव्हाण हा धुळे जिल्ह्यांतील असल्याने तो भारतात परत आल्यापासुन धुळेकरांना त्याची घरी येण्याची उत्सुकता लागली होती. शनिवारी अखेर होळीच्या शुभ मुहर्तावर होळीच्या पूर्व संध्येला चंदू चव्हाणचे धुळ्यात आगमन झाल्यानेे धुळेकरांची होळी रंगीत झाल्याची दिसून आली. 29 सप्टेंबरला नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या चंदू चव्हाणला पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते. चंदू चव्हाण याची 21 जानेवारीला पाकिस्तानाने म्हणजे तब्बल चार महिन्यांनी भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्तानने सुटका केली होती. दरम्यान भारतात परतल्यानंतर चंदूला लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान, त्याच्यावर उपचारही सुरू होते. अखेर शनिवारी चंदू आपल्या गावी परत येत असल्याने धुळेकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. खुद्द संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे चंदू चव्हाणला सोबत धुळ्यात घेऊन आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून आले. चंदू चव्हाण याचे मुळ गाव धुळे जिल्ह्यातील बोरविहीर आहे. चंदू हा 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असून तो जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जीकल्स स्ट्राईक नंतर 29 सप्टेंबरला चंदूने चुकून सीमा ओलांडल्यामुळे तो पाकिस्तानच्या सिमेत पोहचला होता. त्यामुळे पाकिस्तानी लष्करांनी त्याला ताब्यात घेतले होते.

डॉ. भामरेंसोबत आगमन
पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण याला सोबत घेऊन केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे हे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास धुळ्यात दाखल झाले होते. शहरातील मनोहर टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महानगर भाजपतर्फे होळीच्या रंगांची उधळण करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, आज धुळेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. चंदू चव्हाणने अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडल्यापासून त्याला मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू होते. बोरविहीर येथे जावून चंदूच्या कुटुंबीयांची आपण भेट ही घेतली होती. त्यांनाही आपण चंदूला परत आणू असा शब्द दिला होता. तो आज पूर्ण झाला, असेही त्यां नी नमूद केले. यावेळी अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, युवराज करनकाळ, विनोद मोराणकर, प्रा. प्रदीप अडसूळ, प्रा. अरविंद जाधव, संजय शर्मा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर शिवाजी महाराजांना अभिवादन करून जवान चंदू चव्हाण त्याच्या घरी म्हणजे बोरविहीर गावाकडे रवाना झाला.

पाककडून चंदूवर अत्याचार
पाकिस्तानातून चंदूची सुटका झाल्यावर त्याला अमृतसर येथील मिलीटरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी चंदूचे घरचे लोक त्याला भेटण्यासाठी अमृतसर येथे गेले असता, चंदूने आपबीती सांगीतल्यावर चंदूचा भाऊ भुषण चव्हाणने दिलेल्या माहितीनुसार चंदूवर पाककडून खुप अत्याचार झाले असल्याचे सांगीतले. भुषण हा देखील लष्करात आहे. दरम्यान चंदू हा पाकिस्तानाच्या लष्कराच्या तावडीत असल्याची बातमी भारतात पसरली. आणि चंदूची बातमी त्याच्या आजीच्या कानावर पडली. ती बातमी ऐकून आजीला मोठा धक्काच बसला आणि ही घटना आजीला सहन न झाल्यामुळे त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांनी जीव सोडला. आजीचा चंदूमध्ये खुप जीव होता. धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावातील जवान चंदू चव्हाण याची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सरक्षण मंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न केले. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच चंदू मायदेशी परत आला आहे. अशी प्रतिक्रीया चंदूच्या परिवाराने दै.जनशक्तिला दिली.

आजींच्या आठवणींनी गहीवरला
जवान चंदू चव्हाण आपल्या गावी म्हणजे बोरविहीर येथे पोहचल्यावर त्याच्या चाहत्यांनी ढोल ताशाचा गजरात रंगांची उधळण करत त्याचे स्वागत केले. गावातील लोकांची चंदूला पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली होती. चंदू येणार असल्याची वार्ता कळल्यानंतर सकाळपासुनच गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले होते. चंदूच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले होते. गावांत चंदूला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चंदू आला का अशी विचारणा प्रत्येक जण एकमेकांना करतांना दिसत होते. यातच चंदूचे आगमन बोरविहीर गावात झाले.यावेळी गावकर्‍यांनी चंदूचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. चंदूला पाहून अनेकांचे डोळे सुखावले. ग्रामस्थांसोबत चंदूलाही त्याच्या आजीच्या आठवणींनी गहीवरुन आले.