चंद्रकांत दादांना कुल्फी-चॉकलेट देण्याची जास्त सवय: खडसेंचा जबरदस्त टोला

0

मुंबई: भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांनी काल शुक्रवारी २३ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज खडसे जळगावच्या दिशेने निघाले आहे. मुंबई ते जळगाव प्रवासात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. दरम्यान खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना राष्ट्रवादीने काही तरी कुल्फी-चॉकलेट दिले असेल असे वक्तव्य केले होते. यावर आता खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून चंद्रकांत पाटील यांना जबरदस्त टोला हाणला आहे. “माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांना पक्षात घेतले त्यांना कोणती कुल्फी-चॉकलेट चंद्रकांत दादा यांनी दिली. चंद्रकांत दादा यांना कुल्फी-चॉकलेट देण्याची जास्त सवय आहे” असा टोला खडसे यांनी लगावला आहे.

बीड येथील गोपीनाथ गडावरील कार्यक्रमातच मी भाजप सोडणार हे निश्चित झाले होते, मग त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मला अडविण्याचा प्रयत्न का केला नाही?, त्यांना माझी गरज राहिली नसेल असेही खडसे यांनी म्हटले आहे. भाजपवर मी नाराज नाही फक्त फडणवीस यांनी मला संपविण्यासाठी डाव रचल्याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला आहे.